बारामती । बारामती बसस्थानकात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे पोलिस चौकी तयार करण्यात आली आहे. या चौकीत तीन पोलिसांना बसण्याची व्यवस्था आहे. मात्र, या पेालिस चौकीला नेहमी कुलूपच लावलेले असते.
सुस्थितीत असलेली ही पोलिस चौकी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होते. येथे कधीच पोलिस हजेरी लावत नाहीत. त्यामुळे भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. ही चौकी उंचावर असल्याने संपूर्ण बसस्थानकावर तेथून देखरेख ठेवता येते. मात्र, येथे पोलिसच बसत नसल्यामुळे चोरांचे चांगलेच फावत आहे. याबाबत बसस्थानक कार्यालयात चौकशी केली असता, तक्रार आल्यानंतर आम्ही माईकवरून पोलिसांना पाचारण करतो, असे सांगण्यात आले. रात्री मद्यधुंद अवस्थेतील नागरिकांचा येथे वावर असतो. त्यामुळे बसस्थानकावर थांबणेही कठीण आणि धोकादायक होऊन बसले आहे. ही पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे.