एक तासाला एक बस : विद्यार्थी, ग्रामस्थ संतप्त
बारामती । बारामती एस. टी. आगारातून वालचंदनगर, भिगवण, निरा, जेजुरी, फलटण या मार्गावर दर 20 मिनिटाला शटल सेवा देण्यात येत होती. परंतु आगाराने महिनाभरापासून ही सेवा बंद केली असून दर एक तासाला बस सोडली जात आहे. यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर तासन्तास ताटकळत बसावे लागते. आगाराच्या या बेजबाबदार कारभारावर प्रवासी व विद्यार्थी प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी महिनाभरात चार-पाच ठिकाणी रस्तारोको आंदोलनही केले. परंतु त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून येतात. बारामती शहरात दररोज 13 ते 14 हजार विद्यार्थी तसेच चाकरमान्यांचीही ये-जा सुरू असते. या सर्वांना एस.टी. हेच एकमेव साधन प्रवासासाठी आहे. विद्यार्थी, कामगार वर्ग महिन्याभराचा पास काढतात. हे एक महिन्याच्या पासाचे पैसे आगाराकडे अगोदरच जमा करतात. या प्रवाशांना एस.टी. ने सुविधा पुरविणे गरजेचे आहे. परंतु महामंडळ याकडे दुर्लक्ष करताना दिसते.
आगाराचे व्यवस्थापन कोलमडले
बारामती डेपो राज्यात सर्वाधिक उत्पन्न देणारा समजला जातो. मात्र या आगाराचे व्यवस्थापन पुर्णत: कोलमडल्याचे दिसून येत आहे. केवळ उत्पन्न वाढविणे या नावाखाली बारामती आगाराने महत्त्वाच्या मार्गावरील बस सेवा बंद केली आहे. या उत्पन्न वाढीचा अधिकार्यांना बढतीसाठी फायदा मिळणार असला तरी प्रवाशांच्या गैरसोयीचे काय? असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे. प्रवासा दरम्यान प्रवासी याबाबत चालक व वाहकांकडे याबाबत उत्तरे मागत असतात. त्यामुळे त्यांच्यात तंटे होण्याचे प्रकार वाढले आहेत. यातूनच बेलवाडी येथे चालक, वाहक यांना मारहाण करण्यात आली होती. यामुळे वाहक, चालक दडपणाखाली असल्याचे दिसून येते. नाव न छापण्याच्या अटीवर काही चालक वाहकांनी आपली नाराजी स्पष्ट व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या अनेक समस्यांना व प्रश्नांना आम्हाला सामोरे जावे लागते. अधिकारी मात्र बाजूलाच राहतात. वेळेअभावी प्रवासी अधिकार्यांकडे जात नाहीत. प्रवासी व आम्ही दररोजच आमनेसामने येतो. संतप्त प्रवाशांना उत्तरे देण्यात आमचा वेळही वाया जातो.
वाहकांची कमतरता
याबाबत एस. टी. आगाराशी संपर्क साधला असता लवकरच ही वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, असे जुजबी उत्तर दिले जाते. मात्र ठामपणे यावर कोणताच निर्णय घेतला जात नाही. काय अंमलबजावणी केली जाईल एवढेच उत्तर दिले जाते. बारामती आगाराकडे चालक वाहकांची संख्या कमी आहे. बसची संख्याही कमी आहे. मात्र या तुटपुंज्या व्यवस्थेत गेली दहा वर्षे शटल सेवा व्यवस्थित चालू होती. उत्पन्न वाढीचा भलताच ध्यास घेतल्यामुळे या शटलसेवा विस्कळीत झाल्या आहेत. याबाबत लवकरच ही शटलसेवा पूर्व पदावर आणावी, अन्यथा प्रवाशांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, अशी भितीही व्यक्त केली जात आहे.