बारामती शहर ठरले अस्वच्छ

0

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत 138व्या स्थानावर; इंदापूर, भोर, सासवड ही शहरेही ठरली वरचढ

बारामती : स्वच्छ सर्वेक्षण 2018च्या स्पर्धेत बारामती शहर अस्वच्छ ठरले आहे. राज्यातील एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत एकूण 217 शहरांमध्ये बारामती 138व्या स्थानावर फेकले गेले होते. जिल्ह्यातील इंदापूर, भोर, सासवड ही शहरेही बारामतीपेक्षा वरचढ ठरली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण 2019ची तयारी सुरू केली आहे. अपयशाला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या त्रुटी दूर करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. 2019 च्या सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे.

173 वा क्रमांक मिळाला

पुणे शहरानंतर शैक्षणिक हब म्हणून ओळख होऊ घातलेल्या, विकासाच्या बाबतीत देशभरात आदर्श मानल्या जात असलेल्या बारामतीला अपयश आले होते. त्यानंतर अपयशाची कारणे शोधून नगरपालिका प्रशासनाने आता अपयश पुसण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य पातळीवर एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 217 शहरांनी 2018च्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये जून महिन्यात जाहीर झालेल्या निकालात बारामती शहर 138 व्या क्रमांकावर राहिले होते. तर पश्‍चिम झोनमधील एकूण 875 सहभागी शहरांमध्ये 173 वा क्रमांक मिळाला होता.

अभियानाबाबत संवाद

त्यामुळे यंदा स्वच्छ सर्वेक्षण 2019साठी राज्यातील स्वच्छ शहरांमध्ये सर्वोच्च स्थानी नावारुपाला येण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांना सामूहिक जबाबदारी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांनी सांगितले की कचर्‍याचे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2019मध्ये यशस्वी होण्यासाठी नागरिकांशी या अभियानाबाबत संवाद साधण्यात येत आहे. नागरिकांना बसण्यासाठी बाके ठेवण्यात येणार आहेत.

स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद

शहरात होणार्‍या स्वच्छतेच्या कामाबाबत समाधान अहवाल संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार झाडू कर्मचारी, शौचालय स्वच्छता करणारे कर्मचारी यांच्या कामाबाबत नागरिकांचा अहवाल घेण्यात येणार आहे. त्यामुळे कचरा, स्वच्छतागृह, घंटागाडीचे कामांबाबत नागरिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचर्‍याचे विलगीकरण, ओराग्यविषयक खबरदारी, नागरिकांमध्ये जनजागृती, नागरिकांच्या सवयीमधील बदल, स्वच्छतेबाबत उपक्रम, स्वच्छतागृहाची स्थिती, स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद या मुद्यांवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.