बारावीचा पहिला पेपर शांततेत !

0

शहरातील 27 केंद्रावर परीक्षा सुरु

पिंपरी चिंचवड: शहरात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेला बारावीचा पहिला पेपर गुरुवारी दि. 21 रोजी शांततेत पार पडला. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपर असल्याने पेपर पुर्वी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर तणावाचे वातावरण होते. परंतू, पेपर सुटल्यानंतर अनेकांनी इंग्रजी पेपर सोपा गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बारावीच्या परीक्षेसाठी शहरात 27 केंद्रावर 21 हजार 142 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. त्या सर्व केंद्रावर सकाळी दहा वाजता पालकांसह विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते.

परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची तपासणी…
प्रत्येक परिक्षा केंद्रांवर मुला-मुलींची झाडाझडती घेवून तपासणी करून परीक्षागृहात सोडण्यात आले. परिक्षेच्या केंद्रावरुन आत जाईपर्यत पालक पाल्यांना काही सुचना देत होते. परिक्षा केंद्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सकाळी 10.15 वाजता सोडण्यात आले. यावेळी अनेक परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच परिक्षा केंद्रामधील वर्गात 10.40 वाजता विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका तर 10.50 वाजता प्रश्‍नपत्रिका वाटप करण्यात आल्या. त्यानंतर 11 वाजता प्रत्यक्ष पेपर लिहिण्यास विद्यार्थ्यांनी सुरवात झाली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच शिक्षण विभागाने देखील खबरदारी घेवून विद्यार्थ्यांना काही सुचना केल्या होत्या. त्यामुळे 27 परीक्षा केंद्रांवर इंग्रजीचा पेपर शांततेत पार पडला आहे, अशी माहिती केंद्र प्रमुखांनी दिली.