भडगाव । सध्या 12 परीक्षेला सुरुवात झाली असून दि. 28 रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. इंग्रजीच्या पेपरापासून परीक्षेला सुरवात झाली. पेपर संपल्यानंतर मात्र कॉप्यांचा सडा लाडकूबाई महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला दिसून आला. दुसर्या दिवशी हिंदी या विषयाच्या पेपरालाही शहरातील केंद्रावर सर्रासपणे कॉपी सुरु असल्याने कॉपी पुरवणार्यांची धडपड दिसून येत होती. प्रशासनाकडून कॉपीमुक्त परीक्षा अभियानाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र शहरातील केंद्रावर दिसून येत आहे. काही शिक्षकांकडुनच झेरॉक्स करुन वर्गात वाटले जाते असल्याचे समजते. याकडे मात्र शिक्षण विभागाकडुन जाणिवपुर्वंक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.
हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान
बारावीचे वर्ष शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या प्रमाणात आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी येतात. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच कॉपी पुरविणार्यांच्या हालचाली दिसून येतात. या हालचालीमुळे हुशार विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊन नुकसान होते.सर्रासपणे कॉपी सुरू राहीली तर आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी हुशार विद्यार्थ्याच्या पालकांकडून केली जात आहे.