परीक्षा परत घेतली जाणार असल्याचे बोर्डाने केले स्पष्ट
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेत शनिवारी सर्व्हर डाऊनमुळे माहिती तंत्रज्ञान विषयाच्या परीक्षेची लिंक ओपन’ होत नसल्याचा प्रकार एका परीक्षा केंद्रावर घडला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना या विषयाचा पेपर देता आला नाही.
बारावीच्या परीक्षेत शनिवारी पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 1.30 पर्यंत माहिती तंत्रज्ञान विषयाचा ऑनलाइन पेपर घेण्यात आला. मात्र, काही परीक्षा केंद्रावर लिंक ओपन न झाल्याने परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांमधे गोंधळ उडाला. दरम्यान, एका केंद्रावरील लॉगिनची तक्रार आली होती. ती सुरळीत करण्यात आली. ज्या परीक्षा केंद्रावर असा प्रकार झाला आहे, त्यांची परत परीक्षा घेतली जाणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेची सोय करण्याच्या सूचना
यासंदर्भात पुणे विभागीय मंडळाचे सचिव बी. के. दहिफळे म्हणाले, पुण्यातील एका केंद्रात माहिती तंत्रज्ञान विषयाचा ऑनलाइन पेपरसाठी लिंक खुली होत नसल्याची तक्रार आली आहे. हा प्रकार सर्व्हर डाऊनमुळे घडला आहे. याच विषयाची परीक्षा दि. 18 व 20 मार्च रोजी होत आहे. त्यावेळी या विद्यार्थ्यांची परीक्षेची सोय करण्याच्या सूचना संबंधित केंद्रांना दिल्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे ही परीक्षा ऑनलाइन होत आहे. त्यामुळे पेपर फुटल्याचा कोणताच प्रकार होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.