बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन व्यवस्था

0

स्व.गोपिनाथराव मुंडे प्रतिष्ठान, श्री सुनील शेळके फाउंडेशनचा उपक्रम

मावळ । बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे आवश्यक असते. यासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान (मावळ) व श्री सुनील शेळके फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील विविध भागामध्ये ’मोफत वाहतूक सेवा’ सुरू करण्यात आली आहे.

देहू, कान्हे, कार्ला, शिवणे, उर्से, पवनानगर, थोरण, कामशेत, जांबवली, कांब्रे आदी गावांमधील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता येणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत येण्या-जाण्याची देखील काळजी करावी लागते. त्यामुळे त्यांचे बहुतांश वेळा अभ्यासावरील लक्ष विचलित होते. याचा परिणाम गुणवत्तेवर होतो. मात्र, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढीस लागणार आहे.

ग्रामीण भागातील वाहतूक अनियमीत
वर्षभर विद्यार्थी जीवतोड मेहनतीने अभ्यास करतात. वेगवेगळ्या खाजगी शिकवण्या लावण्यात येतात. परीक्षेची जय्यत तयारी केली जाते. मात्र परीक्षा कालावधीत जर गोंधळ झाला तर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरते. ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था अजूनही सुस्थितीत तसेच वेळेवर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर होतो. अशा आणि आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांसाठी स्व. गोपिनाथराव मुंडे प्रतिष्ठान व श्री सुनील शेळके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे विविध स्तरांमधून कौतुक केले जात आहे.