पुणे : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र शालान्त परीक्षा फेबु्रवारी 2017 मध्ये घेण्यात आल्या होत्या. मे महिना संपत आला तरी अद्याप निकालाची तारीख घोषित करण्यात आलेली नाही. या परीक्षेच्या निकालाची तारीख सोमवारी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.
अनेक दिवसांपासून सोशल मीडियातून निकालाच्या विविध तारखा पसरवल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मागील वर्षी 25 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. त्यामुळे यावर्षी या तारखेच्या आसपास निकाल लागेल अशी अपेक्षा विद्यार्थी बाळगून होते. परंतु अद्याप निकालाची तारीखच जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरीकडे व्हॉट्स अॅपवरून निकालाच्या वेगवेगळ्या तारखा आणि प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादीच फिरत असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे अखेर मंडळाच्या अध्यक्षांनीच याबाबत खुलासा केला आहे.
शनिवार आणि रविवारच्या शासकीय सुटीनंतर सोमवारी मंडळातर्फे तयारीचा अंतिम आढावा घेतला जाईल आणि त्याच दिवशी निकालाची तारीख जाहीर केली जाईल, असे गंगाधर म्हमाणे यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 किंवा 31 तारखेला बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.