बारावी परीक्षेतही विद्यार्थिनींनी मारली बाजी

0

निकालानंतरही विद्यार्थिनींचा जल्लोष ; 12 जून रोजी मिळणार निकालपत्र

भुसावळ- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला. यंदा जळगाव जिल्ह्याचा निकाल 84.20 टक्के लागला असून त्यात मुलांपेक्षा मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून येते. बुधवारी निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शहरातील सायबर कॅफेसह इंटनेटवर निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. निकाल हाती पडताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. भुसावळ विभागात भुसावळ तालुक्याचा 81.97, मुक्ताईनगर 82.32, बोदवड 82.11, यावल 86.47 तर रावेर तालुक्याचा निकाल 81.24 टक्के लागला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप व तपशीलवार गुण दर्शवणार्‍या शालेय अभिलेखाचे वाटप विभागीय मंडळातर्फे मंगळवार, 12 जून रोजी करण्यात येणार आहे.

कोटेचा महिला विद्यालयात विद्यार्थिनींनी मिळवले यश
भुसावळ- प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले. कला शाखेचा निकाल 70.17 टकके, वाणिज्य शाखेचा 81.75 तर विज्ञान शाखेचा निकाल 98.86 टक्के लागला. कला शाखेतून मानसी दीपक वाघमारे (78.77), वाणिज्य शाखेतून सेजल राजेंद्र चोरडीया (84.46) तर विज्ञान शाखेतून प्रणाली संजय अहिरराव (86.61) प्रथम आली. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्था चालक, प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.भदाणे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी गौरव केला.

मुक्ताईनगर तालुक्यात विद्यार्थ्यांचा जल्लोष
मुक्ताईनगर तालुक्याचा बारावी परीक्षेचा 81.98 टक्के निकाल लागला. तालुक्यातील सात कनिष्ठ महाविद्यालयात मार्च 2018 मध्ये एक हजार 400 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी 29 विद्यार्थी डिस्टींक्शनमध्ये , 435 विद्यार्थी ग्रेड एक मध्ये तर ग्रेड दोन मध्ये 641 विद्यार्थी आणि ग्रेड पास मध्ये 59 विद्यार्थी असे एकूण एक हजार 147 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 81.98 टक्के लागला. मुक्ताईनगरातील जे.ई.स्कूलचा निकाल 89.10 टक्के लागला. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून एकूण निकाल 395 पैकी 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अंतुर्लीच्या एम.एफ.तराळ विद्यालयाचा 86.13 टक्के निकाल लागला. विज्ञान, कला , वाणिज्य शाखेतून 239 पैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उचंद्याच्या घाटे विद्यालयाचा 83.11 टक्के निकाल लागला. कला शाखेतून 77 पैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इच्छापूरच्या ज्ञानपुर्णा विद्यालयाच्या कला शाखेतून 111 पैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 71.17 टक्के निकाल लागला. कुर्‍हा येथील शिवाजी हायस्कूलचाच 72.64 टक्के निकाल लागला. कला शाखेतून 117 पैकी 85 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कुर्‍हा येथील फडके विद्यालयातील 275 पैकी 227 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 73.03 टक्के निकाल लागला. संत मुक्ताबाई विद्यालय कला व वाणिज्य शाखेतून 186 पैकी 149 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 80.10 टक्के निकाल लागला.