पुणे । किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या वतीने आयोजित केला जाणारा किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव यंदा गुरुवार (दि.4) ते सोमवार (दि. 8) दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर कलादालन आणि घोले रोड कलादालन येथे संपन्न होणार आहे. महोत्सवात वन्यजीव संरक्षक एम. के. रणजित सिंह यांना यंदाचा वसुंधरा सन्मान देण्यात येणार आहे. तसेच महोत्सवात आरती कुलकर्णी यांना इको जर्नालिस्ट आणि डॉ. दीपक आपटे यांना ग्रीन टीचर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष माधव चंद्रचूड, गौरी किर्लोस्कर, वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुप्रिया चित्राव, जुई तावडे, सुप्रिया गोटूरकर उपस्थित होते. किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र वनविभाग, सी. एम. एस. वातावरण, महाराष्ट्र साहित्य परिषद, गो वाईल्ड, स्क्वेअर 1, इन्टॅक, सागरमित्र, जीवित नदी, सेरी, सिम एज्यु, जलबिरादरी, पगमार्क्स, लोकायत यांच्या सहयोगाने महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
‘माय एन्काउंटर विथ कॅमेरा’ दृक-श्राव्य सादरीकरण
12व्या किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचा उदघाटन समारंभ दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थु यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता होणार आहे. समारंभात तीन किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. छायाचित्रकार गणेश शंकर यांच्या हस्ते 5 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर गणेश शंकर यांचे ‘माय एन्काउंटर विथ कॅमेरा’ हे विशेष दृक-श्राव्य सादरीकरण होणार आहे.
‘इको बाजार’चे उदघाटन
5 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे लेखक, विचारवंत व पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे पुरस्कर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते व गौरी किर्लोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इको बाजार’चे उदघाटन होणार आहे. रविवार (दि. 7) रोजी सकाळी अकरा वाजता पंडित पजवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते आणि डॉ. विजय भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. सोमवार (दि. 8) रोजी सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व कलादालन येथे किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाची सांगता होणार आहे.