बारा तासांच्या अथक प्रयत्नाने तुटलेला हात पुन्हा मिळाला

0

शिरगाव । म्हणताना डॉक्टर देव नाही परंतु देवापेक्षा कमी नाही याचा प्रत्यय सोमाटणे येथे पवना हॉस्पिटलमध्ये आला. येथील डॉक्टरांनी धडापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडण्याची यशस्वी शत्रक्रिया केली. मोनजिन शेख (वय 20) हा कलकत्त्याहून सोमाटणे येथे कामानिमित्त आला होता. काम करत असताना सिमेंट मिक्शर मध्ये त्याचा उजवा हात आला. त्यामुळे तो खांद्यापासून तुटून गेला. त्याला त्वरित पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी लगेच तो हात पुन्हा जोडण्याचा निर्णय घेतला. 12 तासांच्या अथक प्रयत्नाने तो हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले.

डॉक्टरांपुढे आव्हान
हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सत्यजीत वाढोकर आणि डॉ. वर्षा वाढोकर यांनी उपचाराचा खर्च कोण करणार आणि जबाबदार नातेवाईकांच्या अनुपस्थितीचा विचार न करता तज्ज्ञांना रुग्णावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. एका खोलीत या पेशंटला स्टॅबिलाईजकरून त्याचे प्राण वाचवण्याचे तर शरीरापासून वेगळ्या झालेल्या हातावर दुसर्‍या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांचे अवयव पुर्नप्रत्यारोपणासाठी सजीव ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. केस ‘हायरिस्क सर्जरी’ आणि हात पुन्हा जोडण्यासाठी सहा तासांचा कालावधी असल्याने प्लॅस्टिक सर्जन डॉ. संदीप नाफडे आणि ऑर्थोपिडीशियन डॉ. प्रवीण वाघमारे यांनी हे आव्हान स्वीकारले. दहा तास ही शस्त्रक्रिया चालली.

आवश्यक सोयीसुविधांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी
मंगळवारी (दि. 14) मोनजिनला घरी पाठविण्यात आले. यावेळी पत्रकारांशीही त्याने संवाद साधला. डॉक्टरांच्या चेहर्‍यावरही समाधानाचे भाव होते. या शस्त्रक्रियेविषयी बोलताना डॉ. संदीप नाफडे म्हणाले की, मेडिकल टर्ममधे यास ‘हायरिस्क चॅलेंजिंग सर्जरी’ म्हणतात. ती यशस्वी करण्यासाठी रुग्णालयात आवश्यक सोयीसुविधा असणे गरजेचे असतात. पवना हॉस्पिटमधे या सर्वसुविधांची उपलब्धता होती. त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ऑर्थोपीडिशियन डॉ. प्रवीण वाघमारे यांनी सांगितले की, मोनजिनची केस कितपत सक्सेस होईल हे सांगणे कठीण होते. परंतू डॉ. सत्यजीत आणि डॉ. वर्षा वाढोकर यांनी परिणामांचा विचार न करता पेशंटवर उपचार करण्याचे धैर्य दिले. आणि आम्ही सर्जरीच्या मागे लागलो.

महाराष्ट्र दुसरी जन्मभूमी
मोनजिनला आर्थक मदतीची गरज होती आणि मी ती केली. मावळ तालुक्यातील कोणालाही वैद्यकीय मदत करण्यासाठी मी कधीही तत्पर असणार आहे. मदतीपेक्षा त्याला हात परत मिळाल्यावर त्याच्या चेहर्‍यावर जे हसू उमललं ते कित्येक लाख मोजून येणार नाही, असे तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सांगितले. माझ्या चुकीमुळे मशिनमधे हात अडकून तुटला. मराठी मित्र आणि डॉक्टरांमुळे माझा जीवही वाचला आणि गमावलेला हातही मिळाला. त्यामुळे आता महाराष्ट्र माझी दुसरी जन्मभूमी आहे. ती सोडून जाणार नाही, असे मोनजिनने सांगितले.

अभ्यासासाठी फायदेशीर
मोनजिन शेखची केस हायरिस्क चॅलेंजिंग सर्जरीच्या प्रकारात मोडते. अशा केसची स्टडी मेडिकल स्टुडंट्स आणि इतर डॉक्टरांना अभ्यासासाठी व प्रॅक्टिस करता मार्गदर्शक ठरेल. त्यांची इंत्यंभूत माहिती अर्थात या केसचे पेपर्स नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिध्द करण्यासाठी लवकरच सादर करण्यात येणार आहेत.
-डॉ. सत्यजीत वाढोकर
व्यवस्थापकीय संचालक, पवना हॉस्पिटल