बारा दिवसांच्या आनंदयात्रेची आज सांगता

0

पुणे । अन्नब्रह्मापासून चिद्ब्रह्मापर्यंत सर्व ब्रह्मांचा स्वामी, पालक किंवा ज्ञानाचा राजा तो ‘ब्रह्मणस्पती’ म्हणजे गणपती! असा या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला होत आहे. पुणे शहरात गणेशोत्सवाला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे. आणि यंदाचा गणेशोत्सव तर पुणेकरांसाठी विशेष महत्त्वाचा होता. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पुणे महापालिकेनेही यासाठी जय्यत तयारी केली होती. ढोल-ताशा वादन व शाडू मातीच्या मुर्त्यां घडविण्याचे दोन विश्‍वविक्रम स्थापित करण्याचा संकल्प पालिकेने केला होता. त्यांपैकी ‘ढोल वाजले’च नाही त्यामुळे एकच विक्रम झाला. भाऊ रंगारी- टिळक हा वाद सुरुवातीला पेटल्यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल की नाही अशी शंका गणेश भक्तांना आली होती. पण सरतेशेवटी लाखों गणेशभक्तांच्या साक्षीने यंदाचा उत्सवही त्याच उत्साहात रंगला. यंदा 12 दिवस बाप्पा मुक्कामी असल्यामुळे मंडळांचा, कार्यकर्त्यांचा, वादकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. आकर्षक देखावा, विद्युत रोषणाई, भव्य स्वागत मिरवणुका यांच्यासह बाप्पांचे कोडकौतुक केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली. मंगळवारी, अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला भावापूर्ण निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे…

प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद
दरवर्षीप्रमाणे लक्ष्मी रस्ता तसेच टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मंडईतील टिळक पुतळ्यापासून मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ होईल.

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे रस्ते (मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मिरवणुकीची सांगता होईपर्यंत):
शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, स्वारगेट), लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक, नाना पेठ ते टिळक चौक, अलका टॉकीज चौक), बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), बाजीराव रस्ता (बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज, शनिवारवाडा), कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे कोपरा, शनिपार), गणेश रस्ता (दारुवाला पूल ते जिजामाता चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक), टिळक रस्ता (जेधे चौक ते टिळक चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक), जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक), फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक ते नटराज चौक), पुणे-सातारा रस्ता (होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक).

बाह्यवळण मार्ग
विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. वाहनचालकांनी बाह्यवळण मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बाह्यवळण मार्ग याप्रमाणे- कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक-विधी महाविद्यालय रस्ता-सेनापती बापट रस्ता-गणेशखिंड रस्ता-वेधशाळा चौक-संचेती हॉस्पिटल चौक-अभियांत्रिकी महाविद्यालय-आंबेडकर रस्ता- शाहीर अमरशेख चौक-मालधक्का चौक-बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरू रस्ता-संत कबीर चौक-सेव्हन लव्हज चौक-वखार महामंडळ चौक-शिवनेरी रस्ता-मार्केट यार्ड-सातारा रस्ता-व्होल्गा चौक-मित्रमंडळ चौक-सावरकर चौक-दांडेकर पूल-शास्त्री रस्ता-सेनादत्त पोलीस चौकी-म्हात्रे पूल-नळस्टॉप वाहनचालकांसाठी उपलब्ध रस्ते जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक), शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा), मुदलीयार रस्ता (अपोलो टॉकीज), नेहरू रस्ता (संत कबीर चौक), सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक), सातारा रस्ता (होल्गा चौक), बाजीराव रस्ता (सावरकर पुतळा चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक), फर्ग्युसन रस्ता (गोखले स्मारक चौक)

57 घाटांवर विसर्जनाची सोय
गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मुठा नदीवरील प्रमुख 17 घाटांसह एकूण 57 घाटांवर विसर्जनाची सोय केली आहे. याशिवाय संपूर्ण शहरात 255 ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली असून या घाटांवर महापालिकेने उभारलेले पाण्याचे हौद, तसेच पाण्याच्या टाक्याही सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन न करता हौदांमध्ये करावे, तसेच निर्माल्य नदीत न टाकता कलशामध्ये टाकावा यासाठी महापालिका कर्मचार्‍यांची पथके आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे.

विसर्जन घाटांवर तीन शिफ्टमध्ये पालिकेचे कर्मचारी तैनात असणार आहेत. शहरात विसर्जनासाठी 255 ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यात 57 घाट, 35 ठिकाणी खडकवासला कालव्यात व विहिरींमध्ये, 53 ठिकाणी हौदात तर 110 ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभगाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. त्याचबरोबर या वर्षी काही घाटांवर मोबाईल कंपन्यांकडूनही विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत.

मंडळांचे आकर्षक रथ
श्रींच्या विर्सजन मिरवणुकीचे केंद्रबिंदू म्हणजे आकर्षक रथ. दरवर्षी बाप्पांच्या विर्सजन मिरवणुकीत विविध प्रकाराचे रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत असतात. यंदाही विविध फुलांची सजावट असलेले, महोत्कट रथ, भुवनेश्‍वर येथील प्राचीन गणेश मंदिर, विद्युत रोषणाईवर आधारित रथ, तसेच समाजप्राबोधनपर आधारित देखावे भाविकांना पाहायला मिळणार आहे. बाप्पाचे विर्सजन काही तासांवर येऊन ठेपल्यामुळे सोमवारी उशिरापर्यंत विर्सजन रथाची तयारी करण्यात कार्यकर्ते व्यग्र होते.

हुतात्मा बाबुगेनू मंडळाने यंदा ओडीशा, भुवनेश्‍वर येथील पुरातन गणेश मंदिर रथ तयार केला आहे. 26 फूट उंच, 24 फूट लांब व 16 फूट रुंद हे मंदिर असून, सत्परंगातील दिव्यांनी तो रथ उजळून निघणार आहे. अखिल मंडई मंडळाने जगदंब रथ साकारलेला आहे. तर नेहरु तरुण मंडळाने 30 फूट उंचीचा महोत्कट गणेश रथ तयार केला आहे. त्यावर अडीच लाख एलईडी दिवे बसविले आहेत. अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने प्राचीन मंदिराची प्रतिकृती रथावर उभी केली आहे. मेघडंबरीत श्रींची मूर्ती विराजमान होणार आहे. 30 फूट उंच व 14 बाय 14 चा रथ असणार आहे. त्यावर आर्कषक नक्षीकाम करण्यात आले आहे. कसबा पेठेतील जनार्दन पवळे मंडळाने यंदा या रथावरच गणपती बसविला आहे. हाच रथ मिरवणुकीत सहभागी करण्यात येणार आहे. याशिवाय बुधवार पेठेतील नेहरू तरुण मंडळाने यंदा चाळीस हजार एलईडी दिव्यांचा वापर करून भव्य रथ बनविला आहे. महोत्कट गणेश रथ असे त्याचे नाव आहे. 40 फूट उंच असा हा देखावा असणारे टिळक रस्त्याने जाणार्‍या मिरवणुकीत हे मंडळ सहभागी होणार आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश वाडकर यांनी दिली. याशिवाय हत्ती गणपती मंडळासह अनेकांचे रथसुद्धा आर्कषक असणार आहेत. खिलारेवाडी मित्र मंडळाने यावर्षी बाहुबली रथ साकारला आहे.

‘दगडूशेठ’ धुम्रवर्ण रथात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक मंगळवारी अनंत चतुर्दशीला थाटात निघणार आहे. यंदा धुम्रवर्ण रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून मोतिया रंगांच्या लाखो दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

‘नादब्रह्म’ व ‘ जनमित्र’चे स्वच्छता अभियान
गणेशोत्सव मिरवणुकीनंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा दिसतो. दुसर्‍या दिवशी महापालिकेतील सफाई कर्मचारीच रस्ते स्वच्छ करताना दिसतात. परंतु विर्सजन मिरवणुकीनंतर रस्ते सफाई करण्याचे हे काम पुण्यातील ढोल- पथकातील तरुणाईने हाती घेतले आहे. नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्ट व जनमित्र फाउंडेशनतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या उपकमात मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी सहभाग घ्यावा असे अवाहन पथकाद्वारे करण्यात आले आहे. ट्रस्टतर्फे मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लक्ष्मी रस्त्यावरील विर्सजन मिरवणुकीतील शेवटचा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर त्वरीत रस्ते सफाईचे काम पथकातील तरुण करणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी दिली आहे.

मिनी हॉस्पिटल व रुग्णवाहिका
गणेश विसर्जन मिरवणूक काळात होणार्‍या गर्दीच्या ठिकाणी येणारी आपत्ती विचारात घेऊन गणेशभक्तांना आणि बंदोबस्तावरील पोलिसांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी मिनी हॉस्पिटल, डॉक्टरांची टीम व रुग्णवाहिका मंगळवार, (दि. 5) ते बुधवार (दि.6) पर्यंत सज्ज असणार आहे. विश्रामबाग फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात निरंजन सेवाभावी संस्थेने दरवर्षीप्रमाणे मिनी हॉस्पिटल उभारले असून त्यामध्ये 5 बेड, महिलांकरीता 2 बेडचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीकरीता 20 डॉक्टर्ससह सर्व यंत्रणा सज्ज आहे.

‘मोरया 125’ मोबाइल अ‍ॅप
यंदाचा गणेशोत्सव पालिकेने हायटेक केला असून शहरातील विसर्जन घाटांची माहिती आणि नकाशे गुगल मॅपवर उपलब्ध करून दिले आहे. खास गणेशोत्सवासाठी विकसितकेलेल्या ‘मोरया 125’ या मोबाइल अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपवर आणि संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर गावाहून येणार्‍या भाविकांच्या सोईसाठी उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांची माहितीही या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. नागरिकांना एका क्लिकवर ही माहिती मिळणार आहे. याशिवाय विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार्‍या रस्त्यांची माहितीही देण्यात येणार आहे. स्वच्छतागृहांची माहितीही एका क्लिकवर विसर्जन मिरवणुकीत आणि शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महिला तसेच पुरुष स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपवर देण्यात आली आहे.

सॅपिअन मोबाईल अ‍ॅपद्वारे पोलीस अधिकार्‍यांवर वॉच
विसर्जन मिरवणुकीमध्ये शहर परिसरात परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी कोठे आहेत, आसपास किती फौजफाटा आहे हे पाहणे गरजेचे असते यासाठी पुणे पोलीस सॅपिअन या खासगी मोबाईलचा वापर करणार आहे. या अ‍ॅपद्वारे जीपीएसद्वारे ट्रॅकींग बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणता अधिकारी कुठे आहे हे लगेच समजणार आहे.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हा अ‍ॅप सर्व पोलीस अधिकार्‍यांना डाऊनलोड करायला सांगून त्यावर आपला मोबाईल क्रमांक नोंदविण्यास सांगितले आहे. या अ‍ॅपसाठी आपले इंटरनेट कनेक्शन व जीपीएस कायम ऑन ठेवावे लागणार आहे. यामध्ये जीपीएसचा आधार घेत अ‍ॅपद्वारे अधिकारी कुठे आहे, कितीवेळ तो त्या ठिकाणी थांबला आहे यावर वॉच ठेवता येणार आहे. यामुळे एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली किंवा गोंधळ निर्माण झाला तर या अ‍ॅपद्वारे नियंत्रण कक्षाला त्या स्थळाच्या आसपास कोणता अधिकारी आहे हे समजेल व त्यावरून संबंधित अधिकार्‍याला आदेश देण्यात येतील. पोलीस आयुक्तालयामधून सर्व नियंत्रण व नियोजन करण्यात येणार आहे.