बारामती । पिंपळी लिमटेक या ग्रामपंचायतीत गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या 11 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा शुक्रवारी (दि.3) 12 वा दिवस होता. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली असून ते या भूमिकेवर ठाम आहेत. तर पंचायत समिती प्रशासन गैरव्यवहारावर खुलासे करण्याचे काम करून उपोषण मागे घेण्याची विनंती पत्रे देत आहे.
बारामती तालुका पंचायत समिती प्रशासनाने जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सविस्तर खुलासे वजा अहवाल दिला आहे. या अहवालात सर्व काही अलबेल आहे. अशीच परिस्थिती विशद केली आहे. मात्र उपोषणकर्त्यांनी जे 38 शक घेतले आहेत त्यातील ज्यादा झालेल्या खर्चाविषयी केवळ अहवाल तपासला आहे. दप्तर तपासले आहे, अशी उत्तरे देण्यात आली. मात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ज्यादा केलेला खर्च ग्रामपंचायत खात्यावर जमा करून नोंद करण्यात आली आहे. तसेच 18 हजार 200 रुपये रोखीने केलेला खर्च अमान्य करण्यात येऊन ग्रामविकास अधिकारी यांचा खुलासा मागविण्यात आला होता. यामध्ये ग्रामपंचायत मासिक सभा व ग्रामसभा ठरावाने मान्यता दिली असल्याकारणाने या खर्चास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे कोणताही अपहार झालेला नाही असे या अहवालात म्हटले आहे. व हा अपहारच नाही, असेही अहवालात म्हटले आहे.
गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष
15 टक्के मागासवर्गीय खर्चाच्या रकमेमधून ग्रामपंचायतीतील सन 2017-18 मध्ये मागासवर्गीयांसाठी समाजमंदिराचे काम घेतलेले असून त्याची मासिक सभेत प्रत सादर केलेली आहे. बारामतीच्या उपअभियंता उपविभागाने अंदाजपत्रकाची मागणी केलेल्या पत्राची प्रत सादर केलेली आहे. परंतू ही दोन्ही उत्तरे सरपंच व ग्रामसेवक यांच्या बचावासाठी असून प्रशासन गैरव्यवहाराला पाठीशी घालत आहे, असा स्पष्ट आरोप सतिश महादेव गावडे यांच्यासह उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांनी केला आहे.