निगडी – वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून रागावलेल्या 12 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी अप्पूघर परिसरात घडला. इशांत बलबीर शर्मा (वय 12, रा. सिद्धिविनायक नगरी, प्राधिकरण) असे आत्महत्या केलेल्या लहान मुलाचे नाव आहे. मागील काही दिवसांपूर्वी इशांतने त्याच्या वडिलांकडे सायकल घेऊन देण्याची मागणी केली. बलबीर यांनी त्याला त्याची मनपसंद सायकल घेऊन देण्याचे अश्वासन दिले. त्यानंतर बलबीर आपल्या कामात व्यस्त होते. त्यांना कामाच्या व्यस्ततेमुळे इशांतला सायकल घेऊन द्यायला जमले नाही. शनिवारी इशांतने रागाच्या भरात पुन्हा सायकलची मागणी केली आणि आपल्या खोलीत गेला. इशांत रागावला असेल आणि त्याचा राग थोड्या वेळात कमी होईल, असे समजून घरच्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. बराच वेळ झाला तरी इशांत बाहेर आला नाही. काही वेळानंतर घरच्यांनी दरवाजा तोडला असता आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.