बार्सिलोनाचा बिलबाओ संघावर दणदणीत विजय

0

माद्रिद : बार्सिलोना संघाच्या यशाची दोर उंचावत असलेली दिसून येत आहे. ला लीगा स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाने अ‍ॅथलेटिक बिलबाओ संघावर 3-0 असा दणदणीत विजय साजरा केला. या विजयाबरोबरच गुणतालिकेत बार्सिलोना आपला कट्टर प्रतिस्पर्धी रियाल माद्रिदपेक्षा फक्‍त एका गुणाने पिछाडीवर आहे. माद्रिदच्या दोन लढती शिल्‍लक असल्या तरी त्यापैकी विगो संघाविरुद्ध होणारी लढत वादळामुळे रद्द झाली आहे.

माद्रिदचे 19 लढतींत 46 गुण
या लीगमधील 21 लढतींनंतर बार्सिलोनाचे 45 गुण झाले असून माद्रिदचे 19 लढतींत 46 गुण आहेत. बिलबाओविरुद्ध लढतीत बार्सिलोनाने आपला स्टार खेळाडू लुईस सुआरेझला आराम देत पाको अल्कासेरला मैदानात उतरवले. ऑगस्ट महिन्यात पाकोला बार्सिलोनाने 32 दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केल होते. त्याने 18 व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाला चांगला प्रारंभ करून दिला. ला लिगामधील त्याचा हा पहिला गोल ठरला. त्यानंतर 40 व्या मिनिटाला लियोनेल मेस्सीने आपल्या खास स्टाईलने फ्रि-किकवर गोल करीत आघाडी दुप्पट केली. या सत्रातील 30 व्या लढतीमधील मेस्सीचा हा 31 वा गोल ठरला. तिसरा गोल विडालने 67 व्या मिनिटाला केला.

संघाचे निर्विवाद वर्चस्व
या लढतीचा प्रारंभ बार्सिलोनासाठी धक्‍कादायक झाला. 12 व्या मिनिटालाच बिलबाओच्या विल्यमसने हेडरने गोल करण्याचा प्रयत्न केला; पण चेंडू गोलपोस्टच्या वरून गेला. त्यानंतर सहाच मिनिटांनी नेमारने दिलेल्या पासवर पाकोने शानदार गोल केला. मध्यांतरानंतर बार्सिलोनाच्या दोन गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती; पण फिनिशिंगअभावी गोल झाले नाहीत. शानदार कामगिरीच्या बळावर बर्सिलोना संघाचे निर्विवाद वर्चस्व दिसून येत आहे.