बार्सिलोना । बार्सिलोना क्लबने रविवारी ला लिगा फुटबॉल स्पर्धेतील लढतीत रिअल सोसीदाद क्लबवर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. लिओनेल मेस्सीच्या उत्कृष्ट कामगिरीच्या शानदार जोरावर मलगा आणि युव्हेंट्स यांच्याकडून पराभव पत्करणार्या बार्सिलोनाने घरच्या मैदानावर पराभवाची मालिका खंडित केली. सामनावीर ठरलेल्या मेस्सीने दोन गोल करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
अर्जेटिनाच्या आक्रमणपटूने पहिल्या सत्रातच दोन गोल करीत बार्सिलोनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मेस्सीचे सर्व प्रकारच्या स्पर्धामध्ये एकूण 498 गोल्स झाले आहेत. 42व्या मिनिटाला बार्सिलोनाच्या सॅम्युएल उम्टिटीच्या स्वयंगोलने सोसीदादचे खाते उघडले आणि त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. निलंबित नेयमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या पॅको अॅल्सेसरला पास देत मेस्सीने संघाला तिसरा गोल करून देण्यात सहकार्य केले.
पॅकोच्या या गोलने बार्सिलोनाने 3-1 अशी आघाडी घेतली. मात्र त्याला त्वरित प्रत्युत्तर देत सोसीदादच्या झाबी प्रिएटोने गोल करून पिछाडी 2-3 अशी कमी केली. मध्यंतरानंतर सोसीदादला यजमानांची बचावफळी भेदण्यात अपयश आले. मेस्सीने याही सत्रात आपला दबदबा कायम राखत चेंडूवर अधिक काळ ताबा ठेवला. या विजयाने बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील परतीच्या लढतीसाठी प्रेरणा मिळाली आहे. पहिल्या लढतीत युव्हेंट्सने 3-0 अशा फरकाने बार्सिलोनावर मात केली आहे.