कुऱ्हाकाकोडागावातील घटना: १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकाऱ्यासह ऑक्सिजनसिलिंडरचा अभाव
मुक्ताताईनगर: लुक्यातील कुर्हाकाकोडा येथील 12 वर्षीय अत्यवस्थ विद्यार्थ्यावर वेळीच औषधोपचार होवू न शकल्याने त्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू ओढवला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी कुर्हा प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारी कुर्हाकाकोडावासीयांनादेखील आला. मोसीन शहा सांडू शहा (12, रा. कुर्हाकाकोडार) हा चिमुकला विद्यार्थी आजारी असल्याने गुरुवारी सकाळी त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. उपचारासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला व मोसीनला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले मात्र वेळीच उपचार न झाल्याने व ऑक्सीजन न मिळाल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू ओढवला. काही वेळेनंतर रुग्णवाहिका आली मात्र त्यात वैद्यकीय अधिकार्यासह ऑक्सीजन सिलिंडरही नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. बालकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आक्रोश करत मुलाच्या मृत्यूस वैद्यकीय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करीत प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. या भागात एकही मोठे रुग्णालय नसल्याने तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात 40 ते 50 किलोमीटर असलेल्या शहराच्या ठिकाणी न्यावे लागते. मुक्ताईनगर तालुक्यात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून या वाहनावर वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे.