‘पाषाण शाळे’साठी मंत्रालयात अनुदानासाठी पाठपुरावा; ४२ हजार बालकामगार घेत आहेत शिक्षण
येरवडा । शिक्षणाच्या माहेरघरात सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी बीज रोवले. त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करणार्या संतुलन संस्थेला बालकामगारांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी गेल्या वीस वर्षांपासून लढा देण्याची वेळ येत असल्यामुळे या संस्थेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? याचे उत्तर मात्र सध्या तरी अनुत्तरितच असल्याचे दिसून येत आहे.
लढा शेवटपर्यंत सुरूच
पाषाण शाळेमध्ये दगडखाणीत काम करणारे ४२ हजार बालकामगार शिक्षणाचा लाभ घेत असून भविष्यात त्यांच्या शिक्षणाचा हक्क त्यांना मिळावा यासाठी संतुलन संस्थेचा लढा शेवटपर्यंत सुरूच ठेवणार! – अॅड. बस्तू रेगे, संस्थापक अध्यक्ष, संतुलन संस्था, पाषाण शाळा
१९९७ साली ‘पाषाण शाळा’
विविध समस्या सोडवित असताना त्यांना प्रामुख्याने अनेक कुटुंबांचा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. तो म्हणजे दिवसभर काबाडकष्ट करून या कुटुंबांचे प्रमुख व्यसनाच्या आहारी गेले आहेत. ते व्यसनाधीन झाल्याने अनेक महिलांना घरसंसार चालविणे देखील अवघड होऊन बसले. दारूच्या आहारी गेलेल्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कुटुंबाच्या या प्रतिकूल पार्श्वभूमीवर ज्या बालकांना पाटी, शिक्षणाचे धडे गिरविण्याचे संधी असताना अशा बालकांच्या हातात बालवयातच दगडखाणीवर नामुश्कीलीने वेळ आली होती. त्यातच पिढ्यान्पिढ्या हेच काम हे कामगार करत असल्याने बालकामगार काम करत असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिले होते. ‘जिथे मूल तिथे शाळा’ ही योजना अमलात आणून रेगे यांनी १९९७ साली ‘पाषाण शाळे’ची स्थापना करून पुण्यासह सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या ठिकाणी स्वखर्चाने शाळेची उभारणी करून मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
‘संतुलन’ संस्थेची स्थापना
राज्यात पुणे, सातारा, अहमदनगर, सांगली, नाशिक, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत दगडखाणी असून या ठिकाणी राज्यासह परराज्यातील दलित आदिवासी, भटक्या-विमुक्त जातींचे कुटुंब दगडखाणीमध्ये काम करून आपले जीवन जगत आहेत. मात्र अशिक्षितपणा, कामगारांच्या संघटित संघटना यांमुळे येथे काम करणार्या कामगारांना अनेक अडचणींचा सामना करून दगडखाणीत उडणार्या धुळीमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. यामुळे कामगारांना संघटित करण्यासाठी अॅड. बस्तू रेगे व त्यांच्या पत्नी अॅड. पल्लवी रेगे यांनी पुढाकार घेऊन ‘संतुलन’ संस्थेची स्थापना करून कामगारांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे विविध हक्कांपासून वंचित राहिलेल्या येथील अनेक कुटुंबामध्ये जनजागृती करून त्यांना हक्काचे रेशनिंग कार्डासह मतदानाचा हक्क बजविण्याचे काम रेगे यांनी केले. याबरोबरच अनेक कुटुबांना शासकीय घरकुल योजनेचा देखील लाभ मिळून देण्याचे काम त्यांनी केले.
रात्रशाळा सुरू
विशेष म्हणजे या सर्व शाळा विनाअनुदानित असल्यामुळे मुलांसह शिक्षकांचा खर्च देणे परवडत नसताना देखील ते हिमतीने उभे राहून मुलांना शिक्षणाचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असून आज राज्यातील दगडखाणीत काम करणारे ४२ हजार बालकामगार शिक्षणाचा लाभ घेत असताना अनेक दगडखाण कामगार अशिक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांच्यासाठी देखील रेगे यांनी रात्रशाळा सुरू करून त्यांना सुशिक्षित बनवले असल्यामुळे अनेक महिलांना यामुळे कायद्याचे ज्ञान देखील मिळाले आहे. त्यातच पाषाण शाळेला अनुदान मिळावे या उद्देशाने रेगे हे गेल्या २० वर्षांपासून अनुदान मिळविण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र याबाबत राज्य सरकारने आजपर्यंत दखल न घेता उदासीनता दाखवली आहे.
या मुलांचा हक्काच्या शिक्षणासाठी न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न रेगे यांनी उपस्थित केला असून भविष्यात तरी पाषाण शाळेला अनुदान मिळेल अशी आशा रेगे यांनी व्यक्त केली आहे. समाजापुढे संतुलन संस्थेने जरी एक नवा आदर्श निर्माण केला असला तरी पण याची दखल घेणे राज्य शिक्षण मंडळाचे काम आहे.