बालकाला चिरडणार्‍या डंपरचालकास न्यायालयीन कोठडी

0

जळगाव। निमखेडी परिसरातील सह्याद्रीनगरमधील हितवर्धीनी सोसायटीत असलेल्या बालाजी अपार्टमेंटसमोर भरधाव येणार्‍या वाळूच्या डंपरने बुधवारी सकाळी 7.15 वाजेच्या सुमारास 3 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तालुका पोलिसांनी चालकाला बुधवारी रात्री अटक केली. त्यास गुरूवारी न्यायाधीश एम. एम. चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

निमखेडी रस्त्यावरील हितवर्धीनी सोसायटीत राहणारा तीन वर्षीय चिमुकला दक्ष उर्फ देवांश कैलास वाणी-भदाणे हा बुधवारी सकाळी 7.10 वाजता काकासोबत कचरा टाकून परत घराकडे येत असताना चंदूअण्णा नगराकडून भरधाव येणार्‍या वाळूच्या डंपरने (क्रमांक एमएच-19-वाय-3757) त्याला चिरडले होते. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात डंपर चालक दीपक सखाराम नन्नवरे (वय 30, रा. निमखेडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला बुधवारी रात्री अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला 5 हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड. केदार भुसारी यांनी कामकाज पाहिले.