बालकाला वाचवताना जामनेरच्या गणेश भक्ताचा मृत्यू

A Ganesha devotee of Jamner drowned while rescuing a child जामनेर : बुडणार्‍या बालकाला जीवदान देताना पाण्यात बुडाल्याने जामनेरातील तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी कांग नदीपात्रात ही घटना घडली. किशोर राजू माळी (30) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बालकाला वाचवताना तरुणाने गमावले प्राण
कांग नदी पात्राच्या पुलावर गणपती विसर्जनासाठी आलेला एक लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून गणेशवाडीच्या किशोर माळी या तरुणाने उडी घेऊन त्या मुलाचे प्राण वाचविले खरे मात्र किशोरचा बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
किशोर या तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, लहान भाऊ असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माळी परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश विसर्जनाला घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जामनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.