जळगाव । परप्रांतिय स्त्रीने जिल्हा सामान्य रूग्णालयात एका मुलीला जन्म देवून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. ही घटना जिल्हा रूग्णालयातील प्रसुति व बालरोग विभागात घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी बालरोग तज्ञ यांच्या फिर्यादीवरून मातेविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पंधरा ते वीस दिवसांचे निरागस बालक हे आईच्या प्रेमाला मुकले आहे.
उत्तरप्रदेशातील लखाई येथील रहिवासी असलेली महिला रेहाना हेसराज शेख या महिलेस 25 जुलै रोजी प्रसुतिसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रसुति कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर महिलने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नवजात बालकाची (मुलगी) प्रकृति चिंताजनक असल्यामुळे बालकास रूग्णालयातील एमआयसीयु विभागात उपचारार्थ हरविण्यात आले. यानंतर रेहाना या महिलेस 28 जुलै रोजी डिस्जार्ज देण्यात आला. दरम्यान, या मातेने आपल्या पोटच्या मुलीला घेवून न जाता चक्क तेथे सोडून पलायन केले. या प्रकरणाबाबत जिल्हा रूग्णालयातील अधिकारी कर्मचार्यांना कळताच आज रविवारी बालरोग तज्ञ अधिकारी स्वप्निल चंद्रकांत कळसकर यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नवजात बालकास सोडून पलायन करणार्या रेहाना शेख या महिलेविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून रेहाना शेख या महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.