बालकीर्तनकार शंभुराजे तौरने जिंकली मने!

0

खेड : खेळण्या-बागडण्याच्या अवघ्या पाच वर्षाच्या वयात एखादा चिमुकला हरी कथेचे कीर्तन करतो, असे कुणी सांगितले तर, त्यावर आपला कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. मात्र, वडगाव घेनंद (ता. खेड) येथील ह.भ.प. शंभुराजे महाराज तौर या बालकीर्तनकाराने येथील भैरवनाथ महाराजांच्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात दुसर्‍या दिवशी ‘होईल भिकारी पंढरीचा वारकरी’ या अभंगावर कीर्तनसेवा बजावून सर्वांना चकीत केले. शंभुराजे तौर याने सुमारे दोन तास कीर्तन सेवा बजावत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

नागरिकांची कार्यक्रमाला मोठी गर्दी
शंभुराजे याने संतांची शिकवण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अचूकपणे श्रोत्यांसमोर मांडली. या बालकीर्तनकाराने आपल्या कीर्तनरुपी सेवेने ग्रामस्थांची मने जिंकून घेतली. अगदी गोड आवाज आणि अभंगाच्या प्रत्येक ओळीची व्यवस्थित मांडणी करत त्याने सर्वांनाच थक्क केले. ऐतिहासिक दाखले ते चालू घडामोडी आदी उदाहरणे त्याने कीर्तनात दिली. या बालकीर्तनकाराच्या कीर्तनाला परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होती. या बालकीर्तनकरावर परिसरातील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.