बालक झाले सज्ञान!

0

शरद पवारांनी राज्यात अनेक राजकीय प्रयोग केले. त्यापैकीच जन्माला घातलेले एक बाळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. कालच्या रविवारी म्हणजे 10 जून रोजी या बाळाला 19 वर्षे पूर्ण झाली. 1999ला शिवाजी पार्कच्या मैदानावर त्याची घोषणा त्यांनी केली ते बाळ आता सज्ञान झाले आहे. भारताच्या सर्वोच्च पदावर फक्त भारतीय वंशाचीच व्यक्ती बसू शकते, अशी भूमिका घेऊन सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी पुढे केला आणि काँग्रेसमधून ते बाहेर पडले. शरद पवार यांनी नव्या पक्षाची घोषणा केली.

राष्ट्रीयस्तरावर खळबळ उडवून देणारा घणाघात 19 वर्षांपूर्वी शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्यावर केला. पी. ए. संगमा, डी. पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल यांना सोबत घेऊन ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि महाराष्ट्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ‘दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे आणि त्यावर माझा विश्‍वास आहे. सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपर्‍यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे.’ असे पवार तेव्हा म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खर्‍या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल, असे पवारांनी स्पष्टपणे नमूद केले होते. त्यांनी आपली वाटचालीची दिशा तेव्हाच स्पष्ट केली होती. त्यांनी हा धागा कायम ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय खंबीरपणे घेतले. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार असो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बहुजनांच्या मतांचा आदर करण्यात शरद पवार नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. हे मान्य करावे लागेल. खरेतर कोणत्याही नव्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्याची बांधणी करण्यात काही दशकांचा कालावधी जावा लागतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे केडर तयार करणे, खालच्या स्तरापासून त्याची बांधणी करणे, हे जिकिरीचे काम असते. पण त्यांनी पक्ष स्थापन करताच सत्तेचे शिखर गाठले. शिवाय त्यानंतर तब्बल पंधरा वर्षे तो पक्ष सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवला. ही पवारांची पॉवर म्हणावी लागेल. त्यांनी तशी निवडच केली होती. तळहातावर उभा महाराष्ट्र मोजणार्‍या पवांच्या तिजोरीत तब्बल 35 ते 40 आमदारांची फौज होती.

पश्‍चिम महाराष्ट्राला कब्जात ठेवणारा दादागट त्यांनी आपल्या विश्‍वासात घेत हे धाडस केले. पवारांनी छगन भुजबळ, दिवंगत आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, नबाब मलीक, अशी कामाची जाण असलेली आणि लोकांमध्ये शिरणार्‍यांची माळ गुंफली होती. प्रशासनावर फटकारे मारण्यासाठी अजितदादा पवार तर संघटना बांधण्यासाठी भुजबळ आणि आर. आर. पाटील या व्यक्तिमत्त्वसंपन्न असलेल्यांना अचूकपणे निवडले होते. घोडा पळाला नाही तर तो निकामी होतो आणि भाकरी फिरवली नाही तर ती करपते याची जाण पवारांना आहे. म्हणून सातत्याने नवे नवे चेहरे पुढे आणणे आणि वेळीच फेरबदल करणे यात त्यांचा हातखंडा आहे. आज 19 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. भुजबळांना जेलमध्ये पाठवण्यात आले. राष्ट्रवादीतील डॉ. विजयकुमार गावितांसारखी अनेक मंडळी भाजपच्या दावणीला बांधली आहेत. पक्षाची बरीच वाताहत करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, पुन्हा एकदा पक्षाने नव्याने उभारी धरण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळ जेलमधून बाहेर आले आहेत, त्यांनी पवारांसोबतच राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, तर पवार सरकारवर कडाडून बरसू लागले आहेत. विधानपरिषदेची निवडणूक असो की लोकसभा, विधानसभेची पोटनिवडणूक असो स्वतः पवार भूमिका घेऊ लागले आहेत. पूर्ण ताकदीनिशी ते मैदानात उतरल्याचे चित्र आहे. दर वीस वर्षांनी नवी पिढी जन्म घेते. सत्तसंघर्षाचे नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांनी धनंजय मुंडेसारखा नवखा मोहरा पुढे आणून मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष करून सावधपणे पवार पुढे सरकत आहेत. त्यांनी कोकणात पुन्हा एकदा पद्धतशीरपणे सुनील तटकरेसारख्या आपल्या शिलेदाराला ताकद दिली आहे. पवार लढाईत नेहमी हुकमाचे एक्के आपल्या हातात ठेवतात.

दुसरीकडे सत्ताधारी भाजपविरोधात जनमत तापत चालले आहे. शेतकर्‍यांना अपमानास्पद वागणूक, त्याच्या मालाला बाजारपेठेत मिळणारी कवडीमोल किंमत, त्यातून निर्माण झालेली उद्विग्नता, नोकरभरतीमध्ये कपातीचे धोरण व त्यामुळे हताश झालेला तरुण, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कोलमडून पडलेला उद्योजक, महागाईमुळे घरखर्च चालवताना मेटाकुटीला आलेल्या गृहिणी, शिक्षण क्षेत्रात सुरू असलेली अनाठायी लुडबूड आणि नसते प्रयोग यामुळे हैराण झालेले शिक्षणक्षेत्र, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, स्त्रीभ्रूण हत्येचा वाढलेला टक्का, अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या शासनकर्त्यांबाबत प्रचंड संताप आणि अविश्‍वास आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज अशा मूलभूत समस्यांचा निपटारा करण्यासाठीही जनतेला झगडावे लागत आहे. या मुद्द्यांना हात घालत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. पवारांनी अजितदादापाठोपाठ सुप्रिया सुळे हा एक चेहरा पुढे आणला आहे. पवारांचे हे रोपटं बर्‍यापैकी रुजलं आहे. त्याची मुळं पक्की झाल्यासारखी वाटत आहेत. राजकीय प्रगल्भता आणि परिपक्वता निर्माण झाल्यासारखी वक्तव्ये त्या करतात. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा समतेच्या चळवळीतील कार्यकर्ता आहे. समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. सर्वसमावेशक, कल्याणकारी शासनव्यवस्थेचा तो पुरस्कर्ता आहे. राज्यातील जनता विद्यमान राज्यकर्त्यांच्या काळात सुखी नाही, हे उघड सत्य आहे. त्यामुळेच या सरकारविरोधात एल्गार करण्यात पक्षाच्या अगदी शेवटच्या कार्यकर्त्यानेसुद्धा पुढाकार घेतला आहे. या लढ्यात पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून इतर कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः उतरले आहे. जोपर्यंत या राज्यातील जनतेच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू फुलणार नाही तोपर्यंत हा संघर्ष कायम राहील’, हे सुप्रिया सुळे यांचे विधान बर्‍यापैकी बोलके आहे. हळूहळू पवार राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादीला पुन्हा एक वेगळा आकार देतील, अशी पावले त्यांच्याकडून पडू लागली आहेत. भाजपच्या समोर राज्यात काँग्रेस नव्हे, तर राष्ट्रवादीचेच आव्हान असेल हे नक्की.