तळेगाव स्टेशन । स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध गुणदर्शन कार्यक्रमाबरोबरच फॅन्सी ड्रेस व डान्स स्पर्धा घेण्यात आल्या.शालेय समितीच्या सल्लागार कुसुम वाळूंज यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम स्पर्धांना सुरुवात झाली. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापिका गावडे व शबनम शेख यावेळी उपस्थित होत्या. फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील पंडित नेहरु, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत जलसंधारण, स्वच्छता, स्वयंशिस्त यांना अधोरेखित करणार्या वेशभूषा विशेष भावल्या.
‘सांस्कृतिक’ कार्यक्रम ही काळाची गरज
भारतीय संस्कृती व देशप्रेम या विषयावर आधारित कार्यक्रम प्रत्येक शाळेत सादर झाले पाहिजेत, ही काळाची गरज असल्याचे कुसुम वाळूंज यांनी सांगितले. गावडे व शेख यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले. शमशाद शेख यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सूत्रसंचलन रुपाली कांबळे यांनी केले. आभार स्नेहल शर्मा यांनी मानले.