पुणे : बालभारतीने पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीच्या आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या पुस्तकात धड्याची पुनर्छपाई झाल्याचे आढळले होते. त्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांकडून तपासणी अहवाल मागविला होता. या अहवालात जिल्ह्यात पुनर्छपाईची तीन पुस्तके सापडली यासंबंधी शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके यांनी हा अहवाल चुकीचा असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना गटनेत्या बुचके यांनी बालभारतीच्या पुस्तकात धड्यांची पुनर्छपाई झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. जुन्नर तालुक्यातील वैष्णणधाम गावातील इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात असंख्य चुका आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये पुनर्छपाई करण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे बालभारतीच्या गहाळ कारभारवर बरीच टीका झाली. बुचके यांनी बालभारतीला टाळे ठोकण्याचा इशारा देखील दिला होता. दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र पाठवून पुस्तकांची तपासणी करून अहवाल मागविला होता.
या अहवालात जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील एका शाळेत इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात पुनर्छपाई झाल्याचे केवळ एक पुस्तक आढळून आले आहे. बुचके यांना जुन्नर तालुक्यामध्ये आढळलेली इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकाच्या पुर्नछपाईची प्रत्येकी एक अशी दोन पुस्तके अशी केवळ तीनच पुस्तके आढळून आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांनी दिली आहे.