नवी दिल्ली : भारतासारख्या मोठ्या देशात आतापर्यंत बालमृत्यूच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. 72 बालकांचा मृत्यू झाल्याची गोरखपूरमधील रूग्णालयात घडलेली ही काही पहिली मोठी दुर्घटना नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. राजीनामे मागणे काँग्रेसचे काम आहे त्याप्रमाणे ते मागत आहेत असेही शहा म्हणाले.
जन्माष्टमी उत्साहात साजरी करा
गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयात ऑक्सिजन अभावी 72 बालकांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करा, असे आवाहन राज्यातील नागरिकांना केले होते. यानंतर अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशात जन्माष्टमी कशी काय साजरी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, त्याला अमित शहा यांनी उत्तर दिले. दरम्यान, विरोधकांनी बालमृत्यूवरून योगी सरकारला धारेवर धरले असून योगींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते राज बब्बर यांनी तर उत्तर प्रदेश सरकार हे खुन्यांचे सरकार आहे, अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी काँग्रेसला उत्तर देताना हे वादग्रस्त वक्तव्य केले.