बालरोग तज्ज्ञ जाणार वाड्यावस्त्यांवर

0

महाड : वैद्यकिय व्यवसाय करणारे केवळ पैसे कमविण्याचेच काम करत असतात. त्यांना समाजाशी काही देणेघेणे नसते. अशी ओरड अनेक जण करत असतात. परंतु महाड तालुक्यातील बालरोग तज्ज्ञ हा समज खोटा ठरवणार आहेत. आता हेच व्यवसायिक वाड्यावस्त्यांवर सामान्यांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी आपल्या दवाखान्यातून बाहेर पडणार आहेत. जलसंजीवनी व स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील बालरोग तज्ञांनी हे पाऊल उचलले आहे. भारतात बालमृत्युचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले असले तरीही ते इतर प्रगत देशांच्या तुलनेत अधिक आहे. हगवणीचे आजार व कुपोषण ही त्याची प्रमुख कारणे आहेत. यासाठी बालरोग तज्ञ संघटना झटत आहेत.

आजारबाबत गैरसमजावर माहिती
दरवर्षी 23 जुलै ते 30 जुलै हा राष्ट्रिय जलसंजीवनी सप्ताह व 1 ऑगस्ट 7 ते ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह देशभर साजरा केला जातो. या उपक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात आरोग्य जागृतीचे काम केले जाणार आहे. या बाबत महाड येथे बालरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, डॉ. सुनील शेठ, डॉ. अजित पुल्ले व डॉ. आनंद जोगदंड यांनी या बाबत पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. उलटी, जुलाबामध्ये ओआरएसचे महत्व, आजार टाळण्याविषयी घ्यावयाची काळजी. आजारांतील गैरसमज या बाबत माहिती देण्यात आली. या सप्ताहात महाड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला मंडळ, बचत गट, ग्रामपंतायत, अंगणवाड्या स्तरावर गावोगावी जाऊन प्रबोधन केले जाणार आहे.

बालमृत्यु कमी करण्यासाठी हातभार लावणार
स्तनपानाचे महत्व, कुपोषण टाळण्यासाठी उपाय व उलटी जुलीबात जलसंजिवनीचा वापर या बाबत तळागाळात माहिती दिली जाणार असल्याचे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी सांगितले. तर सुनिल शेठ यांनी या बाबत उपलब्ध असलेल्या लसींची माहिती दिली. अशा प्रबोधनांच्या माध्यमातून जलसंजीवनी व स्तनपानाचे महत्व लोकांना पटवून देऊन बालमृत्यु कमी करण्यासाठी बालरोग तज्ञ हातभार लावणार आहेत. सामाजिक संस्था व नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन बालरोग तज्ञ संघचनेचे जिल्हाध्यक्ष डाँ.आबासाहेब पाटणकर व सचीव प्रमोद वानखेडे यांनी केले आहे.