बालवाडी बंद केल्याने दामिनी संघटनेचे 12 एप्रिल रोजी आंदोलन

0

धुळे । मनपा प्रशासनाने अचानक बालवाड्या बंद केल्याने याचा निषेध म्हणून 12 एप्रिल रोजी दामिनी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. बालवाड्या बंद करण्यात येवू नये, बालवाडी सेविकांचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून उच्च न्यायालय,मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतांनाही 103 बालवाडी शिक्षिका/मदतनीस यांच्यावर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची व भिक मागण्याची वेळ येणार आहे. याचा निषेध म्हणून 12 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, भिक मागो आंदोलन करण्यात येणार आहे.

बालवाड्या बंद करणार्‍या व्यक्तींची व त्यांचे पुनर्वसन करण्यास टाळाटाळ करणार्‍या मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापासून मनपा पर्यंत काढण्यात येणार आहे. सदर आंदोलन दामिनी बालवाडी शिक्षिका, मदतनीस संघटनेच्यावतीने अ‍ॅड.चंद्रकांत मोहन येशीराव यांच्या अध्यक्षतेखाली, दामिनी महिला अन्याय अत्याचार निवारण समिती तसेच विविध सेवाभावी संस्था व संघटना,सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येणार आहे.