बालविवाहापासून अल्पवयीन मुलीची सुटका

0

धुळे । तालुक्यातील बेंद्रेपाडा येथे दि.21 रोजी अवघ्या 16 वर्षीय रोशनी (नाव बदलेले आहे) हिचा विवाह संजय पाटील (वय 25) यांच्याशी होत असल्याचे पत्र तालुका पोलीस अशोक पाटील यांना प्राप्त झाले. विवाहाच्या तीन दिवसांआधी त्यांना हे पत्र मिळाले. त्यांनी अगोदर याबाबत शहानिशा केली. त्यात तथ्य आढळून आल्याने त्यांनी ही बाब जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रत्ना वानखेडकर यांना सांगितली. वानखेडकर आणि हवालदार पाटील यांनी ब्र्रेंद्रेपाडा येथे जाऊन त्या मुलीच्या पालकांची व नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना हा विवाह करु नये, अशी विनंती केली.

मुलीचे पालक व नातेवाईक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर रत्ना वानखेडकर व हवालदार अशोक पाटील यांनी मुलीच्या नातेवाईकांना बाल विवाह कायद्याबाबत माहिती सांगून, तुम्ही जे करत आहात तो गुन्हा आहे, असे सूचीत केले. यासाठी अंगणवाडी सेविका वेणूबाई अहिरे, संरक्षण अधिकारी प्रकाश जाधव, पोलीस पाटील देवराम पाटील, सरपंच सुभाष पाटील यांची मदत घेतली. काही तास समजूत घातल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनीही मोडण्यास होकार दर्शविला. आणि अखेर हा बाल विवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले. जर या अधिकारी व पोलिसांनी यासाठी प्रयत्न केले नसते. तर काही महिन्यांनी या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले गेले असते. तिच्या खेळण्या, बागडण्याच्या वयात ती आई झाली असती. बाळाच्या संगोपणाची जबाबदारी तिच्यावर आली असती. यामुळे तिला भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागले असते. परंतू, आता या सर्व संकटातून तिची सुटका झाली आहे. मात्र समाजात अशा असंख्येने रोशनी या पालक आणि समाजाला मजबूर होऊन बालविवाहला बळी पडत आहेत त्यांची सुटका होणे देखील अपेक्षित असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.