भुसावळ। अहमदनगर येथील सेवक फाउंडेशनतर्फे शिवपूर कन्हाळा येथे आयोजित बालसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यासोबतच वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला.
शिवपूर कन्हाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या सेवक बालसंस्कार शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोहंमद गवळी अध्यक्षस्थानी, तर सेवक फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल राठोड, नगरसेवक रवि सपकाळे, नाना पाटील, सुरेंद्र पाटील, ललिता बोंडे, हेमांगी पाटील, पोलिस पाटील जगन्नाथ पाटील, मुख्याध्यापिका कुंदा पाटील आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या शिबिरात मैदानी खेळ, वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सेवक टीमध्ये रोहिणी चौधरी, सीता पाटील, निता पाटील, मोहिनी झांबरे, करिश्मा चौधरी, रवि निंबाळकर, अशोक गायकवाड, आकाश चौधरी, प्रेरणा चौधरी, आदिती आंबिलवाडे आदींची उपस्थिती होती. या शिबिराद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल, असा सूर समारोपप्रसंगी उमटला.