यावलमध्ये बालाजी महाराजांच्या जयघोषात रथोत्सव मिरवणूक

0

रथोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मांदियाळी ; 105 वर्षांची अखंड परंपरा ; खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त चोपडा रस्त्यावरून ओढल्या बारागाड्या ; भवानी माता मंदिराजवळ रथ आल्यानंतर उत्सवाची सांगता

यावल- सुमारे 105 वर्षाची परंपरा असलेल्या येथील श्री बालाजी महाराज रथोत्सवास बालाजी महाराजांच्या जयघोषात महर्षी व्यास मंदिर पायथ्यालगतच्या नदीपात्रातून शुक्रवारी सायंकाळी सुरवात झाली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप नगराजवळील नदीपात्रात रथयात्रेचे आगमन झाले. याचवेळी खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त चोपडा रस्त्यावरून बारागाड्या देखील ओढण्यात आल्या. दरम्यान शनिवारी पहाटे भवानी माता मंदिराजवळ रथाचे आगमन झाल्यानंतर उत्सवाचा समारोप करण्यात आला. उत्सवप्रसंगी पालिकेकडून नदीतील रथमार्ग व्यवस्थित दुरूस्त न केल्याने भाविकातून संताप व्यक्त करण्यात आला.

रथोत्सवात बालाजी महाराजांचा जयघोष
सायंकाळी येथील महर्षी व्यास मंदिराजवळ नदीपात्रात ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात रथाची महापूजा करण्यात आली व रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. व्यास मंदिर ते महाराणा प्रताप नगरापर्यंत सुमारे एक किलोमीटर नदीपात्रातून श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरीकांनी रथ ओढला. महाराणा प्रताप नगराजवळील नदीपात्रात खंडोबा महाराज यांच्या यात्रेचे आयोजन केले होते. तसेच खंडोबा महाराज यांच्या बारागाड्यादेखील चोपडा रस्त्यावरून नदी पात्रापर्यंत ओढण्यात आल्यात. बारागाड्या ओढण्याचा मान बडगुजर गल्लीतील भगत गजानन काशिनाथ बडगुजर यांना मिळाला होता. रथोत्सव, यात्रा आणि बारागाडया पाहण्यासाठी महिलांसह नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर रथयात्रेचे शहरात आगमन झाले. रथाच्या पूजन व स्वागता करीता घरा-घरातून भाविकांकडून स्वागत व पूजन केले जात होते. पहाटेच्या सुमारास भवानी माता मंदिराजवळ रथ आल्याने रथोत्सवाची सांगता झाली. रथमार्गावर महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. रथोत्सवानिमित्ताने बाहेरगावाकडे असेली नोकरदार मंडळी, माहेरवाशीण शहरात माहेरी आल्या आहेत तर रथोत्सव आणि खंडोबाच्या बारागाड्यांसाठी यावलचे पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त राखला.

या मार्गावरून रथोत्सवाची मिरवणूक
रथाचा मार्ग चावडी, मेनरोड, बोरावलगेट, देशमुखवाडा, लक्ष्मीनारायण मंदिर मार्गे रथ ओढण्यात आला तर शनिवारी पहाटे देवीच्या मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास रथोत्सवाची सांगता झाली. शहरातील अरूंद व चढ-उताराचे रस्ते, रथाची भव्य उंची व सुमारे 12 टन वजन असलेल्या या रथास मोगरी लावणे, आणि त्यास वळविणे ही कामे पूर्वीपासूनची नेमलेली मंडळीच ही कामे करतात. रथासोबत असलेल्या विशिष्ट पेहरावातील भालदार-चोपदार मंडळी शहरवासीयाचें लक्ष वेधत होती.