बालिका अत्याचारातील आरोपींना शिक्षेसाठी मुक मोर्चा

0

धुुळे । शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे पाचवर्षीय बालिकेवर अत्याचार झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही पसार असून, ही घटना दडपण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी, शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसह घटनेचा निषेध करण्यासाठी महिला दिनाच्या दिवशी 8 मार्चला मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. येथील गल्ली क्रमांक दोनमधील तेली भवनात गुरुवारी दुपारी चार वाजता तेली समाजाची बैठक झाली.

पिडित बालिकेस आर्थिक मदत जाहीर
बैठकीत मूकमोर्चा काढण्याचा निर्णय झाला. समाजाचे अध्यक्ष भगवान करनकाळ अध्यक्षस्थानी होते. या वेळी महापौर कल्पना महाले, महापालिकेच्या स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, युवराज करनकाळ, बिपीन चौधरी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, सुनील पाटील, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, सुरेखा नांद्रे आदी उपस्थित होते. यावेळी भगवान करनकाळ म्हणाले की, बालिकेवर अत्याचार करणार्‍याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महिला दिनी मूकमोर्चा काढण्यात येईल. या वेळी युवराज करनकाळ यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तसेच पीडित बालिकेला 11 हजारांची मदत जाहीर केली.