बालिकेचा मृतदेह पुरणार्‍या महिलांचा लागला शोध

0

देहूरोड : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापदेवनगर येथे रेल्वे रुळालगत खिंडीत खड्डा खोदून तीन महिने वयाच्या बालिकेचा मृतदेह पुरणार्‍या त्या दोन महिलांचा छडा पोलिसांनी लावला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीअंती, संबंधित बालिकेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक असलेल्या त्या दोन्ही महिलांकडे सुपूर्द करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बालिकेचा मृतदेह पुरणार्‍या त्या दोन्ही महिलांना येता-जाताना एका सजग नागरिकाने पाहिले होते. त्या नागरिकाने त्यांच्या दुचाकीला क्रमांक लक्षात ठेवला होता. याच दुचाकी क्रमांकाची पोलिसांना मदत झाली. दुचाकीच्या क्रमांकामुळे पोलिसांना त्या महिलांपर्यंत पोहचता आले. दोन्ही महिलांची चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यावरच खरी माहिती समोर येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.