सोयगाव। तालुक्यातील हनुमंतखेडा येथील अल्पवयीन बालिकेच्या हत्येची ठिणगी सोमवारी 17 जुलै सोयगावला पडल्याने सोयगावातील ही ठिणगी राज्यव्यापी होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने गृहखाते हवालदिल झाले आहे. दरम्यान हनुमंतखेडा येथील सीमा राठोड मृत्यू प्रकरणी सोयगाव शहरात गोरसेना शाखेच्या वतीने मूकमोर्चा काढून निषेध करण्यात आला. यावेळी सोयगाव शहर बंदचा एल्गार पुकारण्यात आल्याने शहर 100 टक्के बंदचा प्रतिसाद मिळाल्याने वाढत जाण्याची धास्ती पोलिसांनी घेतली आहे.
ठिकठिकाणी पोलीसपथके तैनात
हनुमंतखेडा येथील सीमा रामदास राठोड (वय 15) पिण्याचे पाणी घेण्यासाठी गावाबाहेरील विहिरीवर गेली असता, तिचे अज्ञातांनी अपहरण करून तिचा खून केला व मृतदेह घाटनांद्रे घाटात फेकून दिला. ही घटना उघडकीस आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान याप्रकरणी 17 सोयगाव बंदचे हाक दिल्याने या बंदमध्ये सर्वसमावेशक सहभाग मोठ्या संख्येने दिसून आल्याने पोलिसांनी मोठा धसका घेतला आहे.पिडीत मुलीच्या मृत्यू प्रकरणी शहरातून मूकमोर्चा काढण्यात आला.शिवाजी चौकातून शिस्तीत निघालेला मूकमोर्चा सोयगाव पोलीस ठाण्यावर धडकला. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप वैराळे, नीरज राजगुरू यांना निवेदन देण्यात येवून माघारी फिरलेला मोर्चेकर्यांनी शिवाजी चौकात प्रशासनाचा निषेध व्यक्त करत मोर्चा तहसील कार्यालयावर वळविला. सोयगावचे तहसीलदार छाया पवार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहरात जिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहरातील मुख्य चौकात दंगाकाबू पथकाचे जवान, दरोडा पथक, सिल्लोड, अजिंठा, फुलंब्री आदि पोलीस पथके तैनात करण्यात आली होती.
हनुमंतखेड्यात सन्नाटा
दरम्यान प्रकरणाच्या दुसर्या दिवशी दि.17 गावात सन्नाटा पसरल्याने भय इथले संपत नाही अशी दहशत ग्रामस्थांच्या मध्ये निर्माण झाल्याने तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे असलेले हनुमंतखेडा हे पिडीताचे गाव शासनाच्या अधिकार्यांच्या भेटी व सांत्वनाअभावी धास्तीत होते.घटना घडून तीन दिवस उलटले तरीही अद्याप शासनाच्या जबाबदार अधिकार्यांनी पिडीतेच्या गावाला धीर देण्यासाठी भेटी दिल्या नसल्याचा रोष ग्रामस्थांमध्ये कायम होता.
न्यायासाठी पुढे सरसावले ग्रामस्थ
पिडीत अल्पवयीन बालिकेच्या अंत्यसंस्कारानंतर दि.17 चा उगवलेला दिवस हनुमंतखेड्यातील ग्रामस्थानी छातीवर दगड ठेवत न्यायासाठी जगायचे असे म्हणत न्याय हक्कासाठी पुढे सरसावल्याने पहिल्यांदा शहर बंदची हाक करून न्यायाच्या मागणीचा संघर्ष सुरु केल्याने हा संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे मूकमोर्च्यातील प्रत्येक सहभागींच्या चेहर्यावर दिसून येत होते.
हनुमंतखेड्याला छावणीचे स्वरूप
दरम्यान सोमवारी दि.17 हनुमंतखेडा गावात जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पोलीस पथके तपासासाठी गावाच्या आजूबाजूला फिरत असल्याने पोलिसांची संशयाची स्थानिक असल्याचे दिसून आल्याने हनुमंतखेड्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.सीमारेषेवर असलेल्या जळगाव पोलिसांनाही घटनेवर लक्ष देण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने जळगाव पोलिसांचाही या घटनेवर डोळा आहे.
आरोप प्रत्यारोपाच्या फेरी
अपहरण करून मृत झालेल्या बालिकेवर अत्याचार झाला नसल्याचा खुलासा पोलिसांनी वैद्यकीय सूत्रांच्या तोंडी सांगण्यावरून केला असल्याने पोलीस प्रशासन अत्याचाराचा दडपादडपीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता राठोड यांनी लेखी निवेदनाद्वारे केला असल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये याबाबत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्याने अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार संभ्रमावस्थेत आहे.पोलिसांनी या घटनेचा राज्यभर उद्रेक होवू नये यासाठी दडपादडपी सुरु केली असल्याचे पोलिसांच्या भूमिकेवरून दिसत आहे.
मूकमोर्चातील क्षणचित्रे
सोयगाव शहरातील गोरसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मूकमोर्चात सर्वसमावेशक समाज पेटून उठल्याचे मोर्च्याच्या संख्येवरून जाणवले होते.शहरातील शिवाजी चौकात गटागटाने नागरिक मिळेल त्या वाहनाने जमू लागले होते.त्यामुळे मूकमोर्चाची व्याप्ती वाढतच गेली.शिस्तबद्ध मोर्चा पोलीस ठाण्यावर गेला व त्या ठिकाणावरून परत शिवाजी चौकात वळलेल्या मूकमोर्च्यात उत्साह संचारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
मूकमोर्च्यातील प्रमुख मागण्या
गोरसेनेच्या वतीने मोर्चाकर्यांनी दिलेल्या निवेदनात प्रमुख मागणीत संबंधित घटनेचा तपास गुप्तचर विभागाकडे सोपवावा,पिडीत अल्पवयीन बालिकेवर अज्ञातांनी केलेल्या अपहरणासोबतच ग्यांगरेप केला असल्याचा आरोप करून पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनात नमूद केला आहे.त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अन्यथा राज्यभर आंदोलने करण्यात येईल,तसेच बलात्काराचा पोलिसांचा दडपादडपीचा मोठा प्रयत्न सुरु असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता या मुकमोर्च्यात व्यक्त करण्यात आली आहे.