बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी

0

नंदुरबार । नाशिक रोड येथील गवळी समाजातील 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्या सुभाष झवर या नराधम व्यापार्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा विरशैव लिंगायत गवळी समाजाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिकरोड येथील मोलमजुरी करून राहणार्‍या गवळी समाजातील दाम्पत्यांची मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून तिला आईसक्र्रीमचे आमिष दाखविले. तसेच बालिकेला व्यापारी सुभाष झवर याने त्याच्या घरी नेऊन निर्दयीपणे अत्याचार केला. या घटनेमुळे पिडीत मुलीच्या आईने समाज बांधवांना सांगितले. त्यानंतर सुभाष झवर विरूद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचार अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी
दरम्यान नाशिक रोडच्या घटनेचे पडसाद सार्‍या महाराष्ट्रात उमटले. या नगराधमास फाशीची शिक्षा व्हावी, दिल्ली येथील निर्भया प्रकरण तसेच कोपर्डी येथील घटनेशी साम्य असणारी नाशिक रोड येथील घटना आहे म्हणून राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा विरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे गंगाराम गवळी, लक्ष्मण यादबोले, महादू हिरणवाळे, यशपाल गवळी, आनंदा घुगरे, हेमंत गवळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.