पाचोरा। बँका, सोसायट्या व खाजगी कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेल्या पाचोरा तालुक्यातील बाळद येथील 62 वर्षीय शेतकर्याने विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपविले. शेतकर्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. नगरदेवळा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे. कर्जामुळे आत्महत्या झालेल्या शेतकर्यास शासकीय मदतीची अपेक्षा कुटुंब व गावकर्यांनी व्यक्त केली आहे.
बाळद येथील शेतकरी दत्तात्रय उत्तमराव सोमवंशी (वय 62) यांनी त्यांच्या गावालगत असलेल्या शेतात 23 च्या मध्यरात्री काहीतरी विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपविले. सदर घटनेची माहिती त्यांचा लहान भाऊ सिताराम सोमवंशी हे नेहमीप्रमाणे शेतातील जनावरांचा चारा-पाणी व दुध काढण्यासाठी गेले असता, त्यांना आपले भाऊ मयत असल्याचे समजले. घटनेची वार्ता गावात पसरताच मयताचे इतर भाऊ, नातेवाईक व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. घटनेची माहिती नगरदेवळा पोलिस ठाण्यास कळविण्यात आल्यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयताचे प्रेत पाचोरा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.
मयत दत्तात्रय सोमवंशी यांची बाळद गावाजवळच 4 ते 5 एकर शेती आहे. ते दररोज रात्री शेतावर जात असत त्याप्रमाणे 23 च्या रात्रीही ते शेतातच गेले होते. मिळालेल्या माहितीवरून समजले की, मयत शेतकर्यावर बँका, सोसायटी व स्मिधन सोने-तारणासह खाजगी स्वरूपाचे लाखांचे कर्ज होते. पावसाचा लहरी व अनियमितपणा डोळ्यावरच्या कर्जामुळे नैराश्येतून त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी चर्चा होत होती. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. ह्या परिवारात मयत सोमवंशी हे कर्जे पुरूष होते. त्यांच्या मृत्युने कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर गावात हळहळ व्यक्त होत होती.