बाळासह पत्नीच्या आत्महत्त्येप्रकरणी पतीला अटक

0

पिंपरी : दापोडी येथील हॅरिस पुलावरून अडीच वर्षाच्या मुलासह नदीत उडी मारून एका 22 वर्षीय महिलेने सोमवारी (20 नोव्हेंबर) आत्महत्या केली होती. त्या महिलेची ओळख पटली असून पती माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी छळ करत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून खडकी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अस्लम जमाल शेख (वय-27, रा.जमदाडे वस्ती, वाकड, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रब्बाना अब्बास शेख (रा.परांडा, उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची मुलगी शाहपरी शेख (वय-22) हिचा 2014 मध्ये आरोपी अस्लम याच्याशी विवाह झाला होता.त्यांना इशान हा अडीच वर्षीय मुलगा होता. दरम्यान मृत शाहपरी ही सासरी नांदत असताना आरोपी असलम याने चारचाकी टेम्पो घेण्यासाठी तिने माहेरून 50 हजार रुपये आणावे यासाठी तिला मारहाण करून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. याला कंटाळून शाहपरी हिने 20 नोव्हेंबर रोजी हॅरिस ब्रीजवरून इशान याच्यासह उडी मारून आत्महत्या केली. पोलीस उप निरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.