बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढे नेवू शकतात: नितेश राणे

0

मुंबई: काल झालेल्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना साजेशी अशीच आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्यांना समाधान देणारी आहे. राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे विचार पुढं घेऊन जाऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाली असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.

मुंबईत काल झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. त्यावरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नीतेश राणे यांनीही वृत्तवाहिन्यांशी बोलताना यावर भाष्य केलं. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. ‘बाळासाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांच्या प्रेमाखातर आजही हे लोक शिवसेनेला मतदान करतात. मात्र, शिवसेना आता बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष राहिलेला नाही. त्यामुळं कडवट शिवसैनिकांपुढं पर्याय नव्हता. त्यांची कोंडी झाली होती. राज ठाकरे यांनी त्यांना पर्याय दिला आहे,’ असं नीतेश म्हणाले.

‘बाळासाहेबांच्या विचारांचा सध्या सतत अपमान होताना दिसतोय. कालच बाळासाहेबांची जयंती झाली. शिवसेना सध्या काँग्रेससोबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. पण सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यापैकी एकाही नेत्यानं बाळासाहेबांना आदरांजली वाहणारी साधी पोस्ट टाकली नाही, यावरूनच आपण समजून जायला हवं. उद्धव ठाकरे यावर चकार बोलत नाहीत. संजय राऊत एखादी भूमिका मांडतात. पण दिल्लीहून फोन आला की लगेच शब्द मागे घेतात. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही,’ असंही नीतेश म्हणाले.