बाळासाहेबांच्या उपस्थितीत अनिल जाधव यांचा प्रवेश

0
वंचित बहुजन आघाडीमध्ये अन्य कार्यकर्तेही दाखल
पिंपरी : पुणे जिल्हा येरवडा मध्यवर्ती कारागृह अभिविक्षक समितीचे माजी सदस्य भाजपचे कार्यकर्ते अनिल जाधव यांनी डॉ.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये जाहिर प्रवेश केला आहे. यावेळी जाधव यांच्या सोबत महेंद्र आदियाल, अरूण चाबुकस्वार यांचा देखील प्रवेश झाला आहे. डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पिंपरीत सभा व महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनिल जाधव यांचा हा प्रवेश झाला. यावेळी व्यासपीठावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे, माजी आमदार लक्ष्मण माने, सचिन माळी, नवनाथ पडळकर, देवेंद्र तायडे, अकिल मुजावर आदी उपस्थित होते.
पहिल्यांदाच भाषण करण्याची संधी 
वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना अनिल जाधव म्हणाले की, आजपर्यंत इतर पक्षांनी माझा केवळ वापर करून घेतला. एखादी सभा होणार असेल तर गर्दी जमवण्याचे काम मला सांगण्यात येत होते. माझी ताकद नको त्याठिकाणी व्यर्थ जात होती. समाजातील वंचित वर्गासाठी प्रकाश आंबेडकर यांनी जो लढा पुकारला आहे त्याला प्रेरित होऊन मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी बाबासाहेबांना कधी पाहिले नव्हते, परंतू आज बाळासाहेबांच्या रूपात मला बाबासाहेबांचे दर्शन झाले आहे. येणार्‍या काळात नक्कीच वंचितांची ताकद काय असते ते दाखवून देऊ.