मुंबई । शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. एक रुपया नाममात्र भाडेतत्त्वावर ही जागा उपलब्ध करून देण्याची विरोधी पक्षाची मागणी मान्य करण्यात आली. या सुधारणेसह विधेयक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात यावे, यासाठी मुंबई महापालिका सुधारणा विधेयक 2017 विधानपरिषदेत मांडण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकात पट्ट्याने देणेबाबत भाडे इतर मोबदला बाजारमूल्यापेक्षा कमी असेल असा होता. मात्र, काँग्रेसचे सदस्य शरद रणपिसे यांनी त्याऐवजी एक रुपया नाममात्र भाडेतत्त्वाने ही जागा देण्यात यावी, अशी सुधारणा विधेयकात करण्यात यावी अशी मागणी केली. राहुल नार्वेकर याच्या निवेदनाविषयी गैरसमज पसरल्याने सेनेच्या सदस्यांनी त्यांच्या भाषणाला हरकत घेतली. त्यामुळे गोंधळ उडाला. त्याचवेळी सुनील तटकरे हे उभे राहिले. बाळासाहेबांविषयी इथल्या सदस्यांच्याच नव्हे, तर सर्वांच्या मनात आदराची भावना आहे. विधेयकाला सर्वपक्षीयांचा पाठिंबा आहे. मात्र, विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यात काही त्रुटी राहू नये हे नार्वेकर यांना सुचवायचे होते असे तटकरे यांनी सांगितले.
गैरसमज दूर झाला
नार्वेकर यांच्याविषयीचा गैरसमज दूर केला. त्याचवेळी विधेयकात एक रुपयात जागा उपलब्ध करून देण्याची सुधारणा करण्यात यावी, अशीही मागणी तटकरे यांनी लावून धरली. पण जसे विधेयक आहे तसेच मंजूर करा, अशी शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका होती. मात्र, विरोधी पक्षांनी तीव्र हरकत घेतली. याचा अधिकार महापालिका आयुक्तांना का द्यायचा, हे सभागृह निर्णय घेऊ शकतात. कायद्यापलीकडे जाऊन सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे तटकरे यांनी सांगितले. विधानसभेत विधेयक दोन मिनिटांत मंजूर करून विधान परिषदेत येतात.