मुंबई । आज बाळासाहेब असते तर शिवसेना – भाजपामध्ये इतके तणाव झालेच नसते. त्यांनी भाजपाला कधीच बाजूला केले असते. साहेबांनी कधीही सत्तेची हाव केली नाही. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे होते. त्याबाबत त्यांनी बाळासाहेबांना सांगितले होते. बाळासाहेबांनी मला विचारले, त्यावेळी मुंडे मुख्यमंत्री होऊदे पण मला त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायचे नाही, असे मी सांगितले. त्यानंतर बाळासाहेबांनी सत्ता नाकारली, असे म्हणत बाळासाहेब जे बोलतील ते करुन दाखवणारे होते, पण उद्धव ठाकरे तसे नाहीत,अनेकदा अपमान होऊनही सत्तेला चिटकून आहे. उध्दव ठाकरे बोलतात ते करून दाखवतात का? हे येत्या 18 तारखेला समजेल. असेही नारायण राणे म्हणाले.
सेनेकडून राजीनाम्याचे नाटक केले जात आहे. शिवसेनेचे मंत्री कामाचे नाहीत हे उध्दव ठाकरे यांनी ओळखले आहे.त्यामुळे ते राजीनाम्याची भाषा करत आहेत.असा घणाघात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला.
बीएमसीतील भ्रष्टाचाराला दोघेही जबाबदार
शिवेसना मंत्री लहान पोरासारखे राजीनामा खिशात घेऊन फिरतात. राजीनामे द्यायचे असताता दाखवायचे नसताता. त्यामुळे उद्धव ठाकरे बोलल्याप्रमाणे 18 फेब्रुवारीला शिवसेना मंत्री राजीनामा देतात का ते पाहू . बीएमसीतील भ्रष्टाचारावरुन भाजप नेते शिवसेनेवर टीका करत आहेत. मात्र भाजपही तिथे सत्तेत होती. त्यामुळे बीएमसीतील भ्रष्टाचाराला दोघेही जबाबदार आहेत.असा आरोप ही केला.भाजपवाले मुंबईतील महत्त्वाची केंद्रं बाहेर हलवत आहेत. मुबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे. निवडणुका आल्या की हे म्हणतात छत्रपतींचा आशिर्वाद. पण महाराजांचा आशिर्वाद फक्त यांनाच आहे का, निवडणुकीत यांना महाराज आठवतात, असा हल्ला राणेंनी चढवला. 25 वर्षात परदेशात मोठी शहरे झाली मात्र मुंबई बकाल झाली.कोणत्याही भागात गेला तर बकाल मुंबई दिसेल, अभ्यासाचा अभाव, माहितीची जाण, हक्क आणि कर्तव्य माहीत नसणे यामुळेच मुंबईचे हे हाल झाले आहे. रस्ते,पाणी किवा मुलभूत प्रश्नांसाठी नगरसेवक असावेच असे नाही ती कामे थांबत नाहीत,त्यापलीकडे कामे होणे आवश्यक असते.मुंबईत एकहाती सत्ता मिळाली,तर मुंबईचे रूप पालटता येईल असे नारायण राणे म्हणाले.
सेनेचे काही आमदार भाजपाच्या गळाला
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये शिवसेनेची सभा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे मंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपवणार अशी चर्चा आहे. ’शिवसेना सत्तेमधून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय घेणार नाही’,सेनेमध्ये काहीजणांना मंत्रीपद न मिळाल्याने जवळपास 20 आमदार नाराज आहेत’, असेही त्यांनी सांगितले. ’आपले सरकार पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगतात. याचा अर्थ सेनेचे काही आमदार त्यांच्या गळाला लागले आहेत किंवा, शिवसेनेने पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याची व्यवस्था त्यांनी केली आहे’, असे राणे म्हणाले.