पुणे । उसने पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून चौघांनी मारहाण करून 22 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सायं. 5 वाजता घडली होती. याप्रकरणी हिंजवडी पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली होती, तर एक जण फरार होता. पोलिसांनी फरार आरोपीला रविवारी अटक केली.फरार असलेल्या आरोपीच्या टोपण नावाच्या साहाय्याने शोध घेत लायन उर्फ प्रथमेश चिंचुळकर (21 रा. वारजे) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. महेश ज्ञानेश्वर वाळवे (22 रा. बावधन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी भरत शंकर चोरगे (22 रा. बावधन), मनोज अंकुश गवळी राजेश दगडे (21 रा. बावधन ) या तिघांना अटक केली असून लायन हा फरार होता. याप्रकरणी सुधीर वाघमारे (20 रा. बावधन) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
500 रुपयांवरून झाला होता वाद
शुक्रवारी सायं. 5च्या सुमारास फिर्यादी व मयत वावळे हे भुंडे वस्तीकडे पायी जात होते. यावेळी मनोज गवळी याने महेशकडे 500 रुपये मागितले यावेळी महेशने ते देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मनोजने इतर तीन साथीदारांना बोलावून महेश याला जबर मारहाण केली. या मारहाणीत महेश याचा मृत्यू झाला तर सुधीर हा सोडविण्यास गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली होती. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए.एम. पगारे करत आहेत.