बावनकुळेंचा भ्रष्टाचार्‍यांना निर्वाणीचा इशारा

0

अहमदनगर। राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:च्याच खात्यातील भ्रष्टाचार करणार्‍यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकार बदललें आहे, मात्र अजूनही लिफाफा पद्धत बंद झाली नसल्याचा जाहीर आरोप करत भ्रष्टाचार्‍यांना सुधारण्याचा इशारा दिला. राळेगणसिद्धीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर ते बोलत होते. बेईमानीची कमाई सत्कारणी लागत नसल्याचा व त्यातून कुटुंबाचे काही भले होत नसल्याचाही सल्ला त्यांनी दरमहा वरकमाईची पाकीटे मिळवणार्‍या अधिकार्‍यांना दिला.

खाजगी गुप्तहेरांची नजर अधिकार्‍यांवर
प्रायव्हेट व्हिजीलन्सकडून आम्ही अधिकार्‍यांच्या मालमत्तेची माहिती घेतोय. नोकरीला लागल्यापासून आतापर्यंतच्या मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे पैसे घेणार्‍यांनी लिफाफा बंद करण्याचे आवाहन त्यांनी केलें आहे. तुम्ही सुधारले नाही तर कायदा बदलून काहीच होणार नाही, असेंही ते म्हणाले. पांगरमल घटना टाळण्याची गरज होती. मात्र यापुढे या घटनांची पुनरावृत्ती झाल्यास सर्वच वरिष्ठांना जबाबदार धरण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे पैसे घेण्याचे त्वरीत थांबवण्याचें आवाहन त्यांनी केलं. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्पादन शुल्कच्या कर्मचार्‍यांना बौद्धिक देऊन सज्जड दम भरला. हजार-दोन हजार रुपयांवर अवैध धंद्याला परवानगी दिली जाते. मात्र, एखाद्याचा बळी गेल्यावर तीन पिढ्या बरबाद होतात. त्यामुळे लिफाफा पद्धत बंद करण्याचें जाहीर आवाहन त्यांनी केलें.

ग्रामरक्षक दल सुधारीत विधेयकाला मंजुरी
ग्रामरक्षक दलाच्या सुधारीत विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ग्रामरक्षक दलाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तक्रारीनंतर बारा तासात कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईत कामचुकार अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. अण्णांच्या पुढाकाराने उत्पादन शुल्क खात्यात आमुलाग्र बदल झाल्याचें त्यांनी म्हटलें आहे. नगरला ग्रामरक्षक दलाचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. 30 जूनपर्यंत जिल्ह्यात ग्रामरक्षक दल स्थापून 15 जूनला राळेगणला बैठक होणार आहे.