नगरसेवकाच्या सतर्कतेने पुण्याहून परतलेल्या नागरिकाची तपासणी
जळगाव– पुण्याहून जळगावातील एका परिसरात एक नागरिक आल्याची माहिती नगरसेवकाला मिळाली. याची गंभीर दखल घेत नगरसेवकाने तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित नागरिकाला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविले.
मिळालेली माहिती अशी की, शनिवारी शहरातील एका परिसरात काही जण पुण्याहून रिक्षाने आले आल्याची माहिती नगरसेवक नितीन बरडे यांना मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही तपासणी न करता जळगावात आलेल्या नागरिकांबाबत बरडे यांनी गंभीर दखल घेतली व या प्रकाराबाबत तातडीने जळगाव प्रांताधिकाऱ्यांना माहिती कळवली. चेक पोस्टवरही संबंधित नागरिकाने तपासणी न करून घेतल्याने त्यांचे नाव प्रशासनाकडे त्यापूर्वीच प्राप्त झाले होते.
नगरसेवक बरडे यांच्याकडुन माहिती मिळताच प्रांताधिकाऱ्यांनी तत्काळ पुण्याहून आलेल्या संबंधित नागरिकाला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सूचना अारोग्य विभागाला केल्या. कर्मचारी तातडीने संबंधित परिसरात दाखल झाले व नागरिकाला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. संबंधितांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नेमके तपासणीत काय निष्पन्न झाले हे मात्र कळू शकलेले नाही. अशाप्रकारे अनेक जण जळगावात आल्याची शक्यता व्यक्त होत असून याबाबत प्रशासनाने माहिती घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.