बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांना आसरा दिल्यास दाखल होणार गुन्हे

0

यावल : कोरोना या संसर्गजन्य विषाणूने जगभरात थैमान माजवले असून दिवसागणिक कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असताना लॉकडाऊनमुळे अनेक लोक गावी निघाले आहेत तर काही नातेवाईकांकडे आश्रयाला येत आहेत मात्र स्थानिक प्रशासनाला कुठलीही माहिती कळवली जात नसल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील नागरीकांनी कोणत्याही नातेवाईकाला घरी बोलावू नये वा कुणी येणार असल्यास त्यांना नकार द्यावा, असे आवाहन यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले आहे. वैद्यकीय चाचणी न करता स्थानिक प्रशासनाची दिशाभूल केल्यास वेळप्रसंगी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कोरोनाचा विषाणू सामाजिक स्तरावर पसरण्याची अत्यंत धोकादायक परीस्थिती निर्माण झाल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

…तर दाखल होणार गुन्हा
ग्रामीण भागात कुणीही आपापल्या नातेवाईकांना बोलावू नये तसेच कुणी येणार असल्यास त्यांना नकार द्यावा तसेच कोणालाही बाहेरून गावावरून आल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन धनवडे यांनी केले आहे. बाहेरगावाहून आलेले नागरीक स्थानिक प्रशासनाला माहिती देत नसल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची भीती आहे त्यामुळे नातेवाईकांना शक्यतो घरी बोलावू नये व आढळून आल्यास सर्वांवर गुन्हे दाखल करून सर्वांना 14 दिवस शासकीय यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्यात येईल, असा इशारादेखील निरीक्षक धनवडे यांनी दिला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असून नागरीकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. काही लोक अद्यापही चोरून-लपून दुधाच्या गाडीत, रुग्णवाहिकेत अथवा स्वतःच्या दुचाकीवर जीव धोक्यात घालून प्रवेश करीत असल्याने हे प्रकार थांबवावेत, असे आवाहनही यावल निरीक्षकांनी केले आहे.