नवी मुंबई । पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या मृतदेहाच्या अवशेष शोध मंगळवारपासून मॅग्नेटोमीटरच्या साहाय्याने घेण्यात येणार आहे. ओशियन सायन्स अॅन्ड सर्व्हायव्हिंग प्रा.लि. या खासगी कंपनीने गेल्या आठवड्यात भाईंदरच्या खाडीमध्ये राबवलेल्या शोधमोहिमेनंतर लोखंडसदृश्य वस्तू आढळून आलेली नऊ ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणांपैकी सर्वप्रथम महत्त्वाच्या दोन ठिकाणी मॅग्नेटोमीटरच्या साहाय्याने आता शोध घेण्यात येणार आहे. या शोधमोहिमेवर नवी मुंबई पोलिसांचा पुढील तपास अवलंबून राहणार आहे. मृतदेहाचा शोध घेणार्या कंपनीने यापूर्वी मॅग्नेटोमीटर इराकहून आणण्याचे निश्चित केले होते. मात्र, हे उपकरण भारतातील एका कंपनीकडे उपलब्ध झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात खासगी कंपनीच्या माध्यमातून भाईंदरच्या खाडीमध्ये नव्याने शोधमोहीम हाती घेतली होती.
खासगी कंपनीची मदत घ्यावी लागणार
या मोहिमेअंतर्गत कंपनीने दोन दिवस ग्रॅडीओमीटर या उपकरणाच्या सहाय्याने भाईंदरच्या खाडीमध्ये लोखंडसदृश्य वस्तू असलेल्या नऊ ठिकाणांचा शोध घेतला. यातील प्रत्येक ठिकाणी पाच मीटरच्या परीघात व एक मीटर जमिनीच्या खोल शोध घेतला जाणार आहे. कंपनीकडून खाडीतील ज्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. त्याशिवाय काही ठिकाणी दगड व इतर गाळ त्यावर आलेला आहे. त्यामुळे या गाळात रुतलेली लोखंडसदृश्य वस्तू शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना इतर काही खासगी कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे.