बिघडलेले गृह!

0

सेक्स रॅकेट, दरोडे, खून, मारामार्‍या, बलात्कार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे राज्यात मोठ्या संख्येने वाढले असून, महिलांना सुरक्षित वातावरण राहिलेले नाही. महिलांशी संंबंधित गुन्ह्यांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली. मागील काही दिवसांतील आकडेवारी पाहिली असता प्रकर्षाने ते जाणवते. बालकांवरील अत्याचारांचे प्रकारही वाढलेत. सध्या राज्यात गुन्हेगारीत टॉपवर असलेले नाव म्हणजे नागपूर. येथे दररोज काहीतरी गंभीर गुन्हे घडत असल्याच्या बातम्या सातत्याने झळकत असतात. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह. विशेष म्हणजे गृहखातेही खुद्द फडणवीस यांच्याकडेच. कदाचित आपल्याच जिल्ह्यातील मुख्यमंत्री, गृहमंत्री आहे म्हणून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटत नसावा, अशीच शंका येते.

मागील तीन वर्षांतील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर राज्यात सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली. ज्यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद अन् गृहमंत्रिपद आहे, त्यांच्याच जिल्ह्यात गुन्हेगारी बोकाळत असेल तर उर्वरित महाराष्ट्रात कोणती स्थिती असेल किंवा उद्भवणार, हा चिंता करण्यासारखा विषय आहे. मुख्यमंत्री आपल्याकडील गृहखाते कुणाकडेही सोपवण्यास तयार नाहीत. हे महत्त्वाचे खाते सांभाळण्यासाठी स्वत:कडे वेळ नसतानाही मुख्यमंत्री या खात्याला का चिटकून बसलेत हेच समजण्यापलीकडचे आहे. गृहखाते अकार्यक्षम आहे, यावर सातत्याने टीका सुरू असते, पण मुख्यमंत्री त्यामध्ये सुधारणाही करत नाहीत किंवा त्या पदावर पूर्णवेळ मंत्रीसुद्धा नेमत नाहीत. दीपक केसरकर हे केवळ नामधारी व बिनकामाचे गृहराज्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहखात्याची अक्षरशः वाताहत झाली. दररोज या खात्याचे कुठे ना कुठे वाभाडे निघालेलेच दिसून येतात. सांगलीमध्ये अनिकेत कोथळे या तरुणाचा तर पाच-सहा पोलिसांनी निर्घृण खून केला. सराईत गुंडांनाही जमणार नाही, अशाप्रकारचे हे हत्यांकाड पोलिसांनीच घडवले. या हत्याकांडाने गृहखात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी नको त्या कामात रुची दाखवत पोलीस दलाकडे दुर्लक्ष केल्याचेच या प्रकरणानंतर जाणवते. अभिनेता अक्षयकुमारकडून आर्थिक मदत घेऊन ती काही कुटुंबीयांना देण्याचा उपक्रम राबवणारे नांगरे-पाटील आपल्या परिक्षेत्रातील पोलीस दल कुठल्या मार्गावर निघाले आहे हे पाहण्याचे मात्र विसरून गेले असावे. अक्षयकुमारकडून मिळालेले धनादेश वाटप करतानाची छायाचित्रे छापून प्रसिद्धीसाठी सरसावणारे नांगरे-पाटील यांनी पोलीस दलाकडेही लक्ष देणे गरजेचे होते. नव्हे, ते त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.

अनिकेत कोथळे खूनप्रकरणात नांगरे-पाटील यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांवरही शिंतोडे उडवले जात आहेत. काहीजण तर त्यांच्या चौकशीसाठी अडून बसलेले आहेत. चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याच्या आरोपाखाली सांगली पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकार्‍यांनी पकडलेल्या अनिकेत कोथळे व अमोल भेडारे या दोघांना थर्ड डिग्री (म्हणजेच पोलीस कोठडीत चार-चौघांनी अगदी घेरून अमानुष व बेदम मारहाण करणे, त्याला मरणयातना देणे) देताना यापैकी कोथळेचा मृत्यू झाला होता. मृत आरोपी अनिकेतचा मृतदेह पोलिसांनी जवळच्या घाटात नेऊन तिथे पेट्रोल ओतून जाळून टाकला व अर्धवट जळालेला मृतदेह दरीत फेकून दिला. खाकी वर्दीतील या गुंडांच्या कृत्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले. पोलीस दलातही काही राक्षस आहेत, हे पाहून प्रत्येकालाच भीती वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात असे किती खुनी खाकीवर्दीत लपून बसलेत याचा शोध घेण्याची गरज आहे. एकदोन नव्हे, तर पोलीस निरीक्षकासह बारा पोलिस कर्मचारी अनिकेत कोथळे खूनप्रकरणात आज तुरूंगाची हवा खात आहेत. याच प्रकरणातून अश्‍लील सीडी बनवण्याचा गोरखधंदादेखील उजेडात आला. या धंद्यातदेखील सांगली पोलिसांचे संबंध असल्याचे उघड होत आहे. चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीच्या कुटुंबीयांना जनप्रक्षोभामुळे राज्य सरकारला दहा लाखांची मदत द्यावी लागली. अनिकेत खरेच लुटमार करत होता का? त्याला खरेच अश्‍लील सीडी बनवण्याच्या प्रकरणाचा सुगावा लागला म्हणून पोलिसांना सुपारी देऊन संबंधितांनी संपविले का? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. तरीसुद्धा त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची वेळ राज्य सरकारवर आली. पोलिसांनी ताब्यातील आरोपीचा कुणाकडून तरी सुपारी घेऊन निर्दयीपणे खून करावा व सुपारीबाजांनी तो मृतदेहही जाळून टाकावा, हे गृहखात्याला लाजिरवाणे कृत्य आहे.

महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था राखणार्‍यांनीच गुन्हेगारांशी हातमिळवणी केली आणि तेच खुनी, मारेकरी झाले तर सर्वसामान्यांनी न्यायासाठी जायचे कुठे? काल-परवा नवी मुंबई या गजबजलेल्या शहरात भुयार खोदून दरोडेखोरांनी बँकेचे तीन कोटी रुपये लंपास केले. पंधरा दिवस हे भुयार खोदले जात असताना पोलीस झोपले होते का? अलीकडेच, मुंबईतील नेहरूनगर, कुर्ला येथे सेक्स रॅकेट उघडकीस आले. पुण्यातही उच्चभ्रू सेक्स रॅकेट सापडत असून, विदेशातील तरुणी त्यात पकडल्या जात आहेत. राज्यातील या सर्व बिघडलेल्या परिस्थितीला फडणवीस आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी पोलीस महासंचालक ही मंडळीच जबाबदार आहेत. अनिकेत कोथळे हत्याकांडानंतर प्रकर्षाने आठवण झाली ती राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. उर्फ आबा पाटील यांची. गृहमंत्री कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आबा. याच आबांच्या जिल्ह्यात पोलीस दलाचे गुन्हेगारीकरण व्हावे हे लांच्छनास्पद आहे. आज महाराष्ट्राला गरज आहे ती आर. आर. पाटील यांच्यासारख्या खमक्या गृहमंत्र्याची.