बिघडलेल्या इंजिनचा केमिकल लोचा!

0

‘लाव रे तो व्हिडिओ’च्या पोस्ट व त्यावर तयार करण्यात आलेले मिम्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध रंग भरण्याचे काम खर्‍या अर्थाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर हा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. स्वत: निवडणूक लढवत नसले तरी राज्यात त्यांनी हवा निर्माण केली आहे. यामुळे मतदानावर किती फरक पडेल? हे आताच सांगणे कठीण असले तरी त्यांच्या सभांमुळे चांगलीच करमणूक होत आहे. मात्र राज ठाकरेंची धरसोड वृत्ती व सातत्याने बदलणार्‍या भूमिकांमुळे मनसेचे इंजिन कोणत्या दिशेने धावत आहे याबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. मोदी-शहा यांच्या विरोधात राज्यभर सभा घेणार्‍या राज ठाकरेंची चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, अशी इच्छा होती. त्यावेळी मोदींना मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी मुंबईत भाजपाविरोधात उमेदवार उभे केले नव्हते. मग आता असे काय झाले? की मोदी आणि शाह जोडगळी त्यांना इतकी खुपते आहे. पुढच्या पाच वर्षांनी राज ठाकरे तिसर्‍यालाच मतदान करा म्हणून सभा घेतील. त्यांना मानणार्‍या मतदारांनी त्यांच्यामागे किती फरफटत जायचे? याचा विचार खुद्द राज ठाकरेंनी करणे गरजेचे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या मनसेच्या इंजिनाची काँग्रेसने साखळी ओढून बे्रक लावला. यानंतर रेल्वेचे इंजिन दिल्लीच्या दिशेने न धावता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इशार्‍यावर राज्यात धावू लागले. भाजपाला मते देवू नका हे सांगण्यासाठी राज यांनी महाराष्ट्रात जाहीर सभांचा धडाका लावला. १२ एप्रिल रोजी नांदेडमध्ये, १५ एप्रिल रोजी सोलापूर, १६ रोजी कोल्हापूरमधील इचलकरंजी तर १८ रोजी पुणे येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. नांदेड येथील पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि आत्ताची विधाने यांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत? यासंदर्भात भाषण केले. पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे ‘स्मार्ट’ भाषण नेटकर्‍यांच्या चांगल्याच पसंतीस पडले. या सभेनंतर ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे चार शब्द नेटकर्‍यांमध्ये लोकप्रिय झाले. अमरावतीतल्या ज्या हरिसालची डिजिटल गाव म्हणून प्रसिद्धी करण्यात आली होती, त्याचे मनसेने केलेले ‘स्टिंग ऑपरेशन’ राज ठाकरे यांनी सादर केले. भाजपच्या जाहिरातीप्रमाणे गावात व्यवहार होत नसल्याचे राज यांनी दाखवून दिले. सोलापूरमधल्या सभेत राज यांनी या जाहिरातीत मॉडेल म्हणून झळकलेल्या तरुणालाच व्यासपीठावर आणले. हरिसाल गावातील कथित लाभार्थी मॉडेलच बेरोजगार झाला असून, तो गाव सोडून गेल्याचा दावा राज यांनी केला. मात्र हे आता राज ठाकरेंवर बुमरँग होवू पाहत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी चोरलेल्या साड्या, हप्ते वसुली, नाशिकची विकासकामे आदींवरुन भाजपाने राज ठाकरेंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत राज ठाकरे हा सर्व खटाटोप का करत आहेत? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसे स्थापन करुन त्यांनी २००९ सालची लोकसभा निवडणूक लढली, यात फारसे काही हाती आले नसले तरी त्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना भरघोस मते मिळाली होती. मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेनेचे काही उमेदवार पडले. विधानसभा निवडणुकीत तर मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले पण २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना फारच कमी मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत तर मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला. तोदेखील अलीकडेच मनसे सोडून शिवसेनेत गेला. २००९ ते २०१४ अशा फक्त पाच वर्षांत मनसेला उतरती कळा का लागली? मतदार मनसेपासून का दुरावला? मनसेचे नगरसेवक आणि एकुलता एक आमदार मनसे सोडून शिवसेनेत का दाखल झाले? या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे यांनी शोधायला हवीत. मागच्या २०१४च्या निवडणुकीत मोदींबरोबर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माझे खासदार निवडून आले, तर ते पंतप्रधानपदासाठी मोदींनाच साथ देतील, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. पण, त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांविरोधातच आपले उमेदवार उभे केले होते. शिवसेना ही भाजपबरोबर अधिकृत होती. त्यामुळे मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला. शिवसेनेला मोदी लाटेचा फायदा झाला आणि त्यांचे कधी नव्हे इतके खासदार निवडून आले. जे नुकसान झाले ते मनसेचेच झाले. लोकसभा निवडणुकीत तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची त्यांची कृती पूर्णपणे पायावर धोंडा पाडून घेणारी ठरली. याच दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी तसेच शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली आणि आघाडी व युतीला पर्याय म्हणून तिसर्‍या स्थानावर असणारी मनसे पाचव्या स्थानावर फेकली गेली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचा प्रस्ताव घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे जाणे म्हणजे त्यांनी शिवसेना सोडण्याची चूक केली, हे मान्य करत शरणागतीचे पांढरे निशाण फडकावण्यासारखे झाले. आताही ते अधिकृतरित्या आघाडीत आले नाही तर मोदी विरोधासाठी सभा घ्यायच्या. त्याचा लाभ ज्याला होईल त्याला होऊ दे. पण, आपली ताकद दाखवून द्यायचीच हे धोरण राज ठाकरे यांनी आखले आणि ते मैदानात उतरले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज ठाकरे आपले बंद पडलेले इंजिन दुसर्‍याला जोडायला पाहत आहेत. या निवडणुकीचा सर्वात जास्त फायदा राज ठाकरे घेताना दिसत आहेत. सातत्याने थेट नरेंद्र मोदींना लक्ष्य करून राज कौशल्याने स्वतःच प्रतिमा संवर्धन करत आहेत, राज ठाकरे यांचे लक्ष्य हे आगामी विधानसभा निवडणुका आहे. आपल्या पक्षाचा पाया राज्यभर व्यापक करण्यासाठी राज ठाकरे या सभांचा वापर करून घेत आहेत. त्यांच्याकडे एकही आमदार, खासदार नाही म्हणून एकाकी झुंज देण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावाच लागतो. वेलीला झाडाच्या खोडाचा आधार मिळाला, तरच तो वेल उंचावर जातो. राज ठाकरेंच्या बाबतीत तसेच झालेले आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत राज ठाकरेंच्या भाषणांचा काही परिणाम होतो का, हे २३ मे अर्थात
निकालानंतर समजेल.