चिंचवड : कुटुंबातील सदस्य घराबाहेर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी प्रौढाने घरात जाऊन छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना बुधवारी (दि. 30) रात्री बिजलीनगर चिंचवड येथे घडली. उमेश शिंदे (वय 41, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उमेश यांची पत्नी आणि मुले घराबाहेर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी उमेश यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. यापूर्वी उमेश यांनी टीव्हीचा आवाज मोठा केल्याने ही बाब घरच्यांच्या उशिरा लक्षात आली. पत्नी आणि मुले गप्पा संपवून घरात येत असताना घराचा दरवाजा बंद दिसला. दरवाजा तोडून उघडला असता हा प्रकार समोर आला. उमेश यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.