नवी दिल्ली । भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलासा देत पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निकालामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाच व जागतिक पातळीवर पाकिस्तानची नाचक्कीही झाली. यामुळे बिथरलेला पाकिस्तान पुन्हा एकदा कुरापती करण्याच्या तयारीत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी लष्कराकडून रचला जात आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ आपल्या बॉर्डर एक्शन टीमचे कमांडो तैनात केले आहेत. भारतीय जवानांवर वारंवार विघातक हल्ले करुन त्यांच्या मृतदेहाची विटंबना करणे हा त्यांचा उद्देश आहे. यापूर्वीही पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमचा भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात समावेश राहिला आहे.
अनेक कारवायांचे अजब तर्कट
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय अमान्य असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. कसाब हा फक्त प्यादा होता. पण जाधव यांचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात असू शकतो. अनेकांचा त्यांनी बळी घेतला असावा. मग सर्वात मोठा गुन्हेगार कोण? असे अजब तर्कट मुशर्रफ यांनी मांडले.पाक सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जायला नको होते. जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर ठाम राहायला हवे होते, अशी बडबड करण्यास ते विसरले नाहीत.
दहशतवादीही पाकच्या साथीला
एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीममध्ये केवळ सैन्यच नाही तर दहशतवाद्यांचाही समावेश आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषा आणि हाजी पीर परिसराजवळ भारतीय जवानांना टार्गेट करण्याचे कारस्थान पाकिस्तानकडून रचण्यात येत आहे. 17 आणि 18 मे रोजी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. भारताकडून झालेल्या गोळीबारात एक पाकिस्तानी एसएसजी कमांडो मारला गेला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कमांडो पाकिस्तानने सीमारेषेवर का तैनात केले आहेत? याचा तपास करताना ‘बॅट’ची ही भयावह बाब समोर आली आहे.
कसाबपेक्षा कुलभूषण मोठे दहशतवादी
आता माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही तारे तोडले आहेत. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यात भारताने फासावर चढवलेल्या अजमल कसाबपेक्षा कुलभूषण जाधव हे मोठे दहशतवादी आहेत, असे ते बरळले आहेत. त्यांच्या या बरळण्याने अजमल कसाब हा एक दहशतवादीच होता, अशी कबुलीच त्यांनी अप्रत्यक्ष दिली आहे.